गुडबाय इमान!

0

मुंबई। मुंबई येथील चर्नीरोडमधील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचारांसाठी तिला अबुधाबीच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यामुळे आज सैफी रुग्णालय प्रशासनाने इमानला पुष्पगुच्छ आणि चॉकलेट्स देवून हर्षमनाने गुडबाय केले.

लठ्ठपणावरील उपचारांकरता मुंबईतील सैफी रुग्णालयात आलेल्या इमानचे वजन आता 176 किलो एवढे झाले आहे. यापुढील उपचारांसाठी इमान अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे. इमानला गुरुवारी सैफी रुग्णालयातून मुंबई विमानातळापर्यंत ग्रीन कॉरिडॉरने नेण्यात आले. मुंबई पोलिसांनी खास तिच्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती. इजिप्तसाठी पुढील प्रवास एअरबस-300ने प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली. या प्रवासासाठी इमानच्या गरजेनुसार विशेष सोयी असलेली ही एअरबस असणार आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता इमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाली. यावेळी इमानसोबत व्हीपीएस हेल्थकेअरच्या टिममधील डॉक्टर्स, परिचारिका होत्या. तसेच तिची बहीण सायमादेखील इमान सोबत रवाना झाली.

दरम्यान, इमानला डिस्चार्ज दिल्यानंतर तिची बहिण सायमा हिने इमानवर उपचार केल्याबद्दल सैफी रुग्णालयाचे आभार मानले. तसेच, अबुधाबी येथील रुग्णालयातील उपचारानंतर इमानला चालणेही शक्य होईल, अशी आशाही तिने व्यक्त केली आहे. याचपार्श्‍वभूमीवर अबुधाबी येथील रुग्णालयातही इमानवर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)च्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहेत.