जळगाव । उन्हाळ्याच्या सुट्या तसेच लग्न सराई सुरू असल्यामुळे गावाला जाणार्यांचे प्रमाण अधिक आहेत. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी शहरात धुमाकुळ घातला असून रविवारी एसएमआयटी कॉलेज रोडवरील गुड्डुराजानगरात रविवारी रात्री चोरट्यांनी तीन बंद घरे फोडली. त्यात चोरट्यांनी एका घरात चांदीचे नाणे आणि 10 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले तर दोन घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(1) एलआयसी एजंटचे फोडले घर
गुड्डुराजानगरातील एलआयसी एजंट वसंत रामकुमार पारीख हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने 11 मे पासून पारीख त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या राजस्थानातील मूळगावी गेलेे होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. हीच संधी साधून रविवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून लॉकर तोडून चांदीचे नाणे तसेच 10 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे. त्यांच्या शेजार्यांनी त्यांना माहिती दिल्यानंतर ते राजस्थान येथून परत येत आहेत.
(2) कपाटातील साहित्यांची फेकाफेक
गुड्डुराजानगरातील प्लॉट क्रमांक 180 गणेश देसले यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या वरच्या मजल्यावर शेतकी संघाचे कर्मचारी वाल्मीक झुलाल पाटील हे भाड्याने राहतात. रविवारी वाल्मीक पाटील यांच्या नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने ते शनिवारी म्हसावद येथे गेलेले होते. सोमवारी सकाळी घरी परत आल्यानंतर त्यांना कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन बघितले तर बेडरूम मधील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील साहित्यांची फेकफाक केलेली होती. मात्र घरात काहीच नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
(3) चोरटे रिकामे हाती परतले
गुड्डुराजा नगरातील प्लॉट क्रमांक 180 मधील अर्ध्या जागेत जैन इरिगेशनचे राजेंद्र पद्माकर दंडवते यांच्या मालकीचा आहे. त्यांची आई आजारी आहे. रविवारी त्यांना सुटी असल्याने ते आजारी आईला बघण्यासाठी कुटुंबियांसह सकाळी चोपडा येथे गेले. सोमवारी सकाळी त्यांच्या शेजार्यांनी त्यांना घरात चोरी झाल्याचे कळविले. मात्र त्यांच्या घरात काहीच नसल्याने चोरट्यांना या घरातूनही रिकाम्या हातानेच परतावे लागले.