गुढीपाडव्याला देशवासियांच्या आरोग्यासाठी पंतप्रधानांची प्रार्थना

0

नवी दिल्ली: गुढीपाडवा अर्थात चैत्र नवरात्रीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहेत. यामध्ये मोदींनी मेडिकल स्टाफ, पोलीस, मीडिया अशा अनेकांचा उल्लेख केला आहे. ‘आजपासून नवरात्रीला प्रारंभ होत आहे. मी गेल्या कित्येक वर्षांपासून मातेची आराधना करत आलो आहे. यंदाची साधना मी मानवतेची उपासना करणार्‍या आणि करोनाविरुद्धच्या लढाईत एकत्रित आलेल्या सर्व नर्स, डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी, सुरक्षेसाठी तसंच सिद्धीसाठी समर्पित करतो’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


करोना व्हायरसविरुद्ध देशात सुरू झालेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज पहिला दिवस आहे. यापार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी ट्विट केले आहे. यापूर्वी मोदींनी आजच आणखी एक ट्विट केले. यामध्ये लिहिले होते ‘या घडीला देशात अनेक उत्सव साजरे केले जात आहेत. आजपासून पारंपरिक नवीन वर्षालाही सुरूवात होत आहे. उगादी, गुढीपाडवा, साजीबू चेराओबा आणि नवरेह यांच्या सर्वांना शुभेच्छा… यंदा दरवर्षीसारखा धुमधडाक्यात हे उत्सव साजरे होणार नाहीत पण हे उत्सवच आपल्याला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतील. देश असाच एकत्र मिळून करोनाशी लढत राहील’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.