गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलीस दल सक्षम

रावेर शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील : तरुणांना शिक्षणाकडे वळण्याचे आवाहन

रावेर : आगामी गणेशोत्सव नागरीकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून शांततेत साजरा करावा शिवाय कायदा सुव्यवस्थेचा सर्वांनी सन्मान करावा. शहराला ऐतिहासीक वारसा असून निरपराधारांचा सन्मान तर गुन्हेगारांवर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन सक्षम असून प्रतिष्ठीत नागरीकांनी निर्भय होऊन शांतता टीकवण्यासाठी समोर यावे व आपले विचार समाजासमोर ठेवावेत व युवकांनी विना कारण कोणत्याही भानगडीत न पडता शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी रावेरच्या शांतता कमेटीच्या बैठकीत केले.

गुन्हेगारी प्रवृत्तीपासनू लांब रहावे -पोलीस अधीक्षक
सुजलाम-सुखलाम असलेल्रूा रावेर तालुक्यातील युवकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लांब रहावे. कुठल्याही चुकीच्या कामांमध्ये सहभाग घेऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, त्यांना चांगले शिक्षण देऊन समाजहिताचे कार्य त्यांच्या हातून करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले. ते म्हणाले की, पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेल्यांसोबत केवळ पाच ते सहा जणांना पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश द्यावा. जास्त गर्दी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

बैठकीत यांची होती उपस्थिती
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंडख, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, नगरसेवक प्रल्हाद महाजन, आसीफ मेंबर, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, सहा.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, अशोक शिंदे, अ‍ॅड.योगेश गजरे, सुधाकर महाजन आदी शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाकडून नागरीकांना अशा आहेत अपेक्षा
बैठकीत नागरीकांनी पोलीस प्रशासनाकडून विविध मुद्दे मांडत अपेक्षा व्यक्त केल्या. त्यात पैसे घेवून आरोपींना सोडण्यात येवू नये, शांततेसाठी पोलिसांनी जनतेत जाऊन बैठका घ्याव्यात, निरपराधांवर पोलिसांनी कारवाई करू नये, शांततेसाठी प्रयत्न करणार्‍यांना आरोपी करू नये, शहरात पोलीस प्रशासनाने जास्त सक्रीय रहावे, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत आदी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केल्या.