यावल। शहरातील महर्षी व्यास मंदिरात रविवारी 9 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांचा मेळा भरणार आहे. दरवर्षी आषाढशुद्ध पौर्णिमेला येथे यात्रोत्सव भरतो, त्यात राज्यभरातील भाविक हजेरी लावतात. यादृष्टीने मंदिर व्यवस्थापनाने आवश्यक तयारीवर भर दिला आहे. महर्षि व्यासांचे देशात केवळ तीन मंदिरे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव मंदिर यावलमध्ये आहे.
मंदिरातर्फे चोख नियोजन
दरम्यान, व्यासांना सकळ विश्वाचे गुरू मानले गेल्याने गुरूपौर्णिमेला व्यास पौर्णिमा मानतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेसाठी हजारो भाविक यावलमध्ये दर्शनासाठी येतात. त्यानुषंगाने यंदा सकाळी 8 ते 10 या वेळेत महर्षींची महापूजा, यानंतर 10 ते सायंकाळपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल. सोबत 21 क्विंटल शिरा तेवढ्याच तांदळापासून तयार केलेल्या भाताच्या प्रसादाचे वाटप होईल. दरम्यान, भाविकांना दर्शनात कोणतीही अडचण येवू नये यासाठी 100 स्वयंसेवक आणि पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या उपस्थितीत बंदोबस्त पुरवण्यात येईल. भारतात महर्षी व्यासांचे तीन मंदिर आहेत. उत्तर प्रदेशातील नैमिश्य, काशी आणि तिसरे मंदिर महाराष्ट्रातील यावल येथे आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त महेलखेडी, कोरपावली, चितोडा, सांगवी, टाकरखेडा, बोरावल, राजोरा, सांगवी खुर्द, दगडी, मनवेल, दहिगाव, मोहराळा येथील दिंड्या व्यास मंदिरावर येतात.
योग वेदांत सेवा समिती
गुरूपौर्णिमेनिमित्त योग वेदांत सेवा समितीतर्फे संत आसाराम बापू आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता आसारामायण पाठ, 11 वाजता व्हीडिओ सत्संग, 12 वाजता मध्यान्ह संध्या, वाजता महाआरती महाप्रसाद असे कार्यक्रम होतील. तसेच जीआरपी ठाण्याच्या प्रांगणात शनिवार 8 रोजी सकाळी 11 ते दूपारी या वेळेत भंडार्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.