तळेगाव दाभाडे : श्रीरंग कलानिकेतन तर्फे श्रीरंग संगीत सभेच्या तिसर्या पुष्पांतर्गत गुरुराव देशपांडे संगीत सभा बेंगळुरू यांनी साकेत मोघे यांच्या शास्त्रीय गायनाचे आणि सहाना बॅनर्जी यांच्या सतार वादनाचे सुरेल सादरीकरण करून तळेगावकरांना गायनाची सुंदर मेजवानी दिली. साकेत मोघे यांनी प्रथम मारवा रागातील एकतालातील बंदिश सादर केली आणि नंतर त्याच्या गुरूंची पं.विनायक तोरवी यांची ‘का करू सैंया बिछडत तोरे संग मोरे चैन’ ही चीज सादर करून रसिकांची दाद मिळवली. जितेंद्र अभिषेकी यांचे नाही ‘पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी’ हे भजन दमदारपणे सादर करून रसिकांची पसंतीची टाळी घेतली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सहाना बॅनर्जी सतार वादनात बिहाग रागातील आलाप, जोड झाला गत वाजवली आणि मिश्र पिलू व भैरवीतील धून सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुरेश फडतरे (संवादिनी) आणि गणेश तानवडे (तबला) यांच्या उत्तम साथसंगतीमुळे कार्यक्रमाचा दर्जा उंचावला.
संगीत यात्रेचा उद्देश
ग्राम संगीत यात्रा ही गुरुराव देशपांडे संगीत सभा बेंगळुरूच्या सुप्रसिध्द गायक पं.विनायक तोरवी यांची संकल्पना. हा भारतातील एक अनोखा उपक्रम आहे. भारतातील विविध प्रांतामधील लहान गावांमध्ये जाऊन तिथल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हिंदुस्थानी राग संगीताचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. अनेक राज्यांमध्ये याचे यशस्वी सादरीकरण झाले आहे. श्रोत्यांनी दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शहरामध्ये जाण्याऐवजी दर्जेदार कार्यक्रम त्याच्या गावीच पोहचवता यावा म्हणून या ग्राम संगीत यात्रेची आखणी केली जाते. श्रीरंग कलानिकेतनचे संस्थापक पं.शरदराव जोशी यांचा गुरुराव देशपांडे संगीत सभा बेंगळुरू तर्फे संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिकांसोबतच तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आवर्जून उपस्थित होत्या. सूत्र संचालन श्रीरंगचे उपाध्यक्ष राजीव कुमठेकर, ग्रामसंगीत यात्रेचे गिरीश आणि कस्तुरी अत्रावलकर यांनी केले. संयोजन प्रकाशराव जोशी, विनय कशेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंगच्या सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी केले होते.