आज 5 सप्टेंबर. सगळीकडे आज शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल. शिक्षकांचे महत्त्व समाजात एखाद्या शिल्पकारासारखे असल्यामुळे हा दिवस उत्साहात साजरा होतो. आज समाजात शिक्षक म्हणजे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व बनले आहे. मात्र, तरीही संपूर्ण जगाला ज्ञानाचे धडे देणार्या शैक्षणिक जगताची स्थिती दिवसेंदिवस खालावत असून, हे म्हणजे जणू दिव्याखाली अंधार झाल्यासारखेच आहे. याला कारणीभूत अनेक घटक आहेत. मात्र, यात मुख्य कारण ठरतंय ते आजचे शिक्षक.
शिक्षक एक आदर्श व प्रेरणादायी उदाहरण म्हणून समाजासमोर असते. एक चांगला शिक्षक हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवू शकतो. शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्यांची व संस्कारांची योग्य सांगड घालत चरित्रवान विद्यार्थ्यांची निर्मिती करू शकतात.शिक्षक हे विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा अर्थ शिकवतात.विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व आपल्या स्वतःच्या जीवनात आणण्याचा कायम प्रयत्न करतात. एकलव्यानेही द्रोणाचार्याला गुरू मानत त्याच्या प्रतिमेला डोळ्यांमध्ये साठवत धनुर्विद्या प्राप्त केली होती. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत येतेय म्हणूनच म्हणतात,
गुरुर ब्रह्मा, गुरुरविष्णु, गुरुरदेवो महेश्वरः
गुरू साक्षात परब्रह्म, तस्मैः श्री गुरुवेः नमः
मात्र आज समाजात काही शिक्षकवर्ग हा भरकटताना दिसत आहे. काही अपवाद वगळता अनेक शिक्षकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे गरजेचे बनले आहे. शिक्षकांनी सदैव निष्ठावान व निःपक्षपाती असावे. आजच्या शिक्षकांमध्ये पारदर्शकता दिसतच नाही. शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी करू नये असे शिकवतात, बहुतांशी त्याच गोष्टी ते आपल्या जीवनात करत असतात. आजचा शिक्षक हा राजकारणात सक्रिय झालेला दिसतो. सरकारी कर्मचारी असल्याने स्वतःला यात पुढाकार घेता येत नाही म्हणून पत्नी किंवा आईवडिलांच्या (नावाच्या) माध्यमातून हे राजकारण खेळण्यात येते. शिक्षकांचा हा जणू राजकारणात अप्रत्यक्षरीत्या सहभागच असतो. विद्यार्थ्यांसमोर संस्कार आणि नितीमूल्यांचे योग्य वाचन करताना हे शिक्षक दिसतात. शाळेत हुंडाबळीवर लांबलचक लेक्चर देणारे हे शिक्षक मात्र आपल्याच पत्नीचा, सुनेचा हुंडा न दिल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे छळ करताना दिसतात. आज शिक्षकांकडे माहितीचा साठा जरी मोठ्या प्रमाणावर असला, तरी मूलभूत ज्ञानाची कमतरता त्यांच्यात भासते. शाळेत किंवा कॉलेजमध्ये 45 मिनिटांपलीकडे शिकवण्याचीही मानसिकता काही शिक्षकांची नसते. शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा साठा स्वतःच्या जीवनातही आचरणात आणावा. ते समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हिताचे ठरेल. आपल्या जीवनात कायम पारदर्शकता राखावी व आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहावे. तरच कुठे त्यांना स्वतःसह विद्यार्थी आणि देशाची प्रगती साधता येईल.
-स्वप्निल सोनवणे
जळगाव
7507728977