बिबवेवाडी । मार्केट यार्डातील भुसार बाजारातील चांदणी चौकात अस्वच्छता व घाण पसरली आहे. कचर्याचे ढीग, अस्वच्छ शौचालये, सर्व्हिस लेनमध्ये अस्वच्छता यामुळे व्यापारी, नागरिक व कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माल वाहतुकीच्या गाड्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी याबाबतची कल्पना देऊनही बाजार समितीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
भुसार बाजारात अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तरीही याबाबत बाजार समितीकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहतुकीचे नियम माल वाहतुकीच्या गाड्यांकडून पाळण्यात येत नाहीत. त्यामुळे येथे अनेकवेळा वाहतूककोंडी निर्माण झालेली असते. पाण्याची अपुरी सुविधा, सर्व्हिस लेनमध्ये अस्वच्छता, अस्वच्छ शौचालये आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मटका, दारू विक्रीचे अवैध धंदेही
या समस्या बाजार समिती प्रशासनाने त्वरित दूर कराव्यात, अशी बाजार घटकांची अपेक्षा आहे. याविषयी दि पूना मर्चंट्सचे चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, बाजार आवारात खूप अस्वच्छता आहे. याबरोबरच येथे अनेक समस्या आहेत. मटका, दारू विक्रीचे अवैध धंदेही येथे सुरू आहे. याकडे बाजार समितीने लक्ष द्यावे, अशी आमची मागणी आहे. यावर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन करणार आहे.
स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी याविषयी मार्केट यार्डात अवैध धंदे करणार्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना कळविले असल्याचे सांगितले. सर्व्हिस लेन काँक्रिटीकरणाबाबत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे तेथील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल. इतर भागातील स्वच्छता करण्याबाबत संबंधितांना सूचना देणार आहे. बाजारात लवकरच अत्याधुनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत.