गुलाबपुष्प देऊन नूतन विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार

0

रावेर। अनु.प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा रसलपूर येथे 15 रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वप्रथम नवगतांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके यांनी सरस्वतीमातेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

वह्या, पुस्तकांचे करण्यात आले वाटप
शाळेतील विद्यार्थीनींनी स्वागतगीत व इशस्तवन सादर केले. अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रभाकर पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पालकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. मार्च 2017 मध्ये इयत्ता दहावीत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला व विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रभाकर पाटील यांनी केली. सुरेश धनके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच सुभाष वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य कैलास पारधी, माजी पंचायत समिती सदस्या जनाबाई महाजन, शुभांगी ठाकरे, मेहरबान तडवी, अनिल चौधरी, शरीफ बेग, रऊफ बेग, शेख सद्दाम, शिवाजी धनके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एन. पाटील यांनी केले तर आभार हरलाल पाटील यांनी मानले.