जळगाव । केंद्र शासनाने ’ स्मार्ट सिटी’ योजना यशश्वीपणे राबविल्यानंतर आता राज्य शासन देखील स्मार्ट व्हिलेज हा अभिनव उपक्रम राबविण्याच्या तयारीत आहे. याबाबत राज्य शासनांनी प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. नेमक्या याच धर्तीवर येथील गुलाबरावजी देवकर अभियांत्रिकच्या ईलेक्स्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थ्यांनी कमी खर्चात स्मार्ट व्हिलेजचा प्रकल्प तयार केला आहे. हा स्मार्ट व्हिलेजचा प्रकल्प मनिष रातिलाल पाटील, रवी रामाश्रय यादव, जयश्री सुभाष सुतार व रूतुजा मनोहर भावसार या चार विद्यार्थानी तयार केला आहे.
सौर उर्जेचा वापर
या प्रकल्पांत स्मार्ट रस्ते, स्मार्ट कचरापेटी, स्मार्ट ईरिगेशन प्रणाली, स्मार्ट गटारी, स्मार्ट पथदिवे या सह इतर बाबीचा समावेश आहे. हा सर्व प्रकल्प सौर उर्जेच्या वापर करून तयार करण्यात आला आहे. कमी खर्चासाठी आपण हा प्रकल्प नेट मिटरिंग पध्दतीने सुद्धा राबवू शकतो. या सर्व प्रकाल्पात सेंसर पध्दतीच्या वापर केला आहे. यात स्मार्ट कचरापेटीत बसविल्या सेन्सरमुळे ती कचरापेटी भरली किंवा नाही याबाबत ग्रामपंचायतीच्या कंट्रोल रूमला सुचीत करते.
स्वयंचलीत पथदिवे
स्मार्ट ईरिगेशन प्रणालीत देखील सेंसरचा वापर केला आहे. यात झाडाजवळील माती जेंव्हा कोरडी राहिल तेंव्हा पाण्याची मोटर आपोआप सुरू होईल. तसेच ठराविक खोलीपर्यत जमिनित पाण्याचा ओलावा गेला की पाण्याची मोटर आपोआप बंद होईल. स्मार्ट पथदिव्यासाठी देखील सौर उर्जेचा वापर केला आहे. यात सर्व पथदिवे रात्री आपोआप सुरु होतील अन् दिवसा सकाळी आपोआप बंद होतील. स्मार्ट जल प्रवाह यंत्रात देखील सेंन्सर पध्दतीचा वापर केला आहे.
नळावर असणार कंट्रोल
या प्रकल्पांत पाण्याची बचत व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. गावातील एखाद्या नळाचे पाणी वाया जात असल्यास नेमका तो नळ ग्रामपंचायतीचा कंट्रोल रूम मधून बंद करता येईल. याविद्यार्थींना प्रा.बी.एस सोनवणे, विभाग प्रमुख प्रा .आर.आर. करे, प्राचार्य ए. जे .पाटील, उपप्राचार्य सी .एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सहसचिव विशाल देवकर यांनी अभिनंदन केले.