केंद्रीय कर्मचार्यांची प्रतीक्षा संपणार
किमान पगारही 21 हजार होणार
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, याच वर्षापासून या कर्मचार्यांना वाढीव पगार मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. वेतन आयोगाच्या शिफारशीहूनअधिक पगार कर्मचार्यांच्या हातात पडेल, तसेच पुढील वर्षाच्या निवडणुका पाहाता, याच वर्षात हा प्रश्न निकाली काढला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच, किमान पगार 18 हजारांऐवजी 21 हजार रुपये करण्यावरदेखील सरकारचे एकमत झाले असून, यापुढील वेतन आयोग संपुष्टात आणण्याचा निर्णयदेखील मोदी सरकारने घेतला असल्याचे सूत्राने सांगितले.
एप्रिलपासून मिळणार वाढीव पगार?
सूत्राच्या माहितीनुसार, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यापुढील वेतन आयोग ही व्यवस्था निकाली काढणार असून, ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टिम लागू करणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारीवर्गासाठी तशी ही वाईट बातमी आहे. 68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख सेवानिवृत्ती वेतनधारकांना अशी एक व्यवस्था सरकार लागू करत आहे, की 50 टक्क्यांहून अधिक डीए असल्यास पगार आपोआप वाढला जावा. तूर्त तरी वेतनवाढीच्या सद्य शिफारशींमुळे कर्मचारीवर्गाच्या सन्मानपूर्वक जगण्यात असंख्य अडथळे येत असल्याचा आरोप कर्मचार्यांनी केला आहे. वित्त विभागाच्या सूत्रानुसार, सातवा वेतन आयोग याच वर्षात लागू करून एप्रिल 2018च्या पगारात वाढीव रक्कम देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय कर्मचार्यांच्या कमीत कमी पे स्केलमध्ये तीन हजार रुपयांची वाढ होईल, तसेच 18 हजार रुपयांऐवजी किमान बेसिक पे 21 हजार रुपये होणार असल्याचेही सांगण्यात आले.