सोयगाव । तालुक्यातील बहुलखेडा येथे गॅस्ट्रोने बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 8 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परीसरासह आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने बहुलखेडा गाव गाठून गावात ग्यास्ट्रो सदृश रुग्णांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. जरंडी, निंबायती, बहुलखेडा या तीन गावात ग्यास्त्रोच्या साथीने नागरिकांचा थरकाप उडवून दिला आहे.विशेष करून मजूर वर्गालाच या साठीची मोठी लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. बहुलखेडा ता.सोयगाव येथील इयत्ता दुसरी इयत्तेत शिकणारी लक्ष्मी शांताराम जाधव (वय 9) या विद्यार्थिनीला दुषित पाणी पिण्यात आल्याने ढाळ,उलट्यांचा मोठा त्रास सुरु झाला होता.
काही तासातच मयत बालिकेला ग्यास्ट्रो बाधित त्रास सुरु झाला असल्याने तिला पाचोरा जि.जळगाव येथील खासगी रुग्णालयात 7 जुलै रात्री तातडीने हलविण्यात आले.परंतु तीची प्रकृती नियंत्रणात येत नसल्याने खासगी वैद्यकीय सूत्रांनी तिला जळगावला हलविण्याचा निर्णय घेतला 8 जुलै मध्यरात्री तिला तातडीने हलविण्याच्या हालचाली सुरु केल्यानंतर पहाटे पाच वाजताच जळगावला उपचारासाठी घेवून जात असतांना तिचा रस्त्यात मृत्यू झाला.दरम्यान या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने मयत बालिकेच्या मृत्यूची माहिती घेतली.दरम्यान बहुलखेडा गावातील पाण्याचे नमुने.शौच नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी दिली.