गॅस सिलेंडर संच वितरीत

0

पिंपळनेर । पिंपळपाडा येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत तीन गावांमधील पात्र आदिवासी समाजाच्या अनु.जमातीच्या महिला कुटुंब प्रमुखांना 177 घरगुती गॅस सिलेंडर व शेगडी संच वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनक्षेत्रपाल श्रीमती जोगदंडे ह्या होत्या. तर आरोग्य विषयक मार्गदर्शक म्हणून डॉ दयानंद कोतकर, सोना गॅस एजन्सी चे संचालक डॉ पंकज चोरडिया, सरपंच सौ.चौरे,उपसरपंच सौ.मावळी, माजी सरपंच बोवाजी मावळी, तंटामुक्ती गाव समितीचे गजानन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व इतर गावातील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.

उज्ज्वला दिवस साजरा
पिंपळगाव खुर्द येथे खैरखुंटा,मोहगाव व पिंपळगाव या गावातील 177 लाभार्थ्याना भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत घरगुती गॅस संच वितरीत करून उज्ज्वला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारत गॅस कंपनीच्या सोना गॅस एजन्सी पिंपळनेर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पिंपळगाव व प्रादेशिक वन विभाग पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान उज्ज्वला योजना दिवसानिमित्त उज्ज्वला दिवस साजरा करण्यात आला. या नमित्ताने 100 उज्ज्वला लाभार्थ्याना गॅस कनेक्शनचा लाभ मिळावा असे आदेश असताना सोना गॅस एजन्सीचे मालक डॉ. पंकज चोरडिया यांनी वनविभागाच्या सहयोगाने 177 उज्ज्वला लाभार्थ्याना लाभ दिला आहे.

संबंधित वितरकाकडे अर्ज करा
यावेळी वनक्षेत्रपाल श्रीमती जोगदंडे यांनी पिंपळगावातील नागरिकांनी चुलीमुक्त गाव करून वनसंरक्षक व वनव्यवस्थापन योग्य केल्यास यावर्षी संत तुकाराम ग्राम योजनेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे सांगून वनविभागाकडून घरगुती गॅसचा लाभ घेण्याचे ही आवाहन करीत योजना समजावून सांगितली. तर डॉ. पंकज चोरडिया यांनी उज्ज्वला योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारतो असून सात श्रेणीमधील लाभार्थ्याना हा लाभ विस्तारित योजनेतंर्गत संबंधित वितरकाकडे अर्ज करण्याचे आवाहन करीत गॅस सिलेंडर कसे हाताळावे यांचे प्रात्यक्षिक महिलांना समजावून सांगितले. महिलांची धुरापासून मुक्तता व्हावी,त्यांच्या जीवनात बदल होऊन मातृशक्तीचा हा उत्सव असल्याचे डॉ. चोरडिया म्हणाले.

आरोग्यविषयी मार्गदर्शन
यावेळी डॉ. दयानंद कोतकर यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शनात धुरापासून होणारे आजार व नुकसान याबाबत सविस्तर माहिती सांगून श्‍वसनाचे होणा-या आजाराबाबत घ्यावयाची काळजी व उपचार याविषयी आरोग्य सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार राजेद्र गवळी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी पंकज चोरडिया, वनपाल नितीन बोरकर, वनसंरक्षक निकम, भोई,अहिरे व नांद्रे तसेच सोना गॅस एजन्सीचे कर्मचारी व वनसमितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.