गेंदालाल मिल भागातील तरुणास मारहाण : चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील गेंदालाल मिल भागात पैसे दिले नाही म्हणून एका तरूणाला चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना मध्यरात्री घडली. याबाबत चार जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा
अशपाक शेख करीम (22, गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण आई, वडील, भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. 30 मे रेाजीच्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अशपाक शेख हा त्याचा मित्र अरबाज याला त्याच्या घरी सोडून पुन्हा घरी जाण्यासाठी पायी जात असतांना रस्त्यावरील चहाच्या दुकानासमोर सुलतान उर्फ बिडी हा अशपाक जवळ येवून पैसे मागितले. त्यावर आपल्याकडे पैसे नसल्याचे अशपाक याने सांगितले. याचा राग आल्याने सुलतान याने सागर, भिम्या आणि पांड्या यांना आवाज देवून बोलावले. चौघांनी अशपाक याला बेदम मारहाण करून जखमी केले. दरम्यान, जखमीवस्थेत त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अशपाक शेख करीम याने सोमवार, 30 मे रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुलतान उर्फ बिडी, सागर, भिम्या आणि पांड्या (पुर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.