गेल्या महिन्याभरात 50 टँकर वाढले

0

जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

पुणे : दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या पन्नासने वाढली आहे. त्यामुळे पुणे विभागातील टँकरची संख्या आता 157 पर्यंत गेली आहे. त्यात सातार्‍यात 55, पुण्यात 46 आणि सांगलीत 44 टँकर सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चारही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 17 डिसेंबर 2018 रोजी पुणे विभागात 107 टँकर सुरू होते. दुष्काळाची तीव्रता वाढल्याने 17 जानेवारी 2019 रोजी विभागात 157 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. डिसेंबर महिन्यात 17 तारखेला दुष्काळ बाधितांची संख्या 2 लाख 6 हजार 213 एवढी होती.

उन्हाळ्यात आकडा वाढण्याची शक्यता

जानेवारी महिन्यात संख्या 3 लाख 7 हजार 178 पर्यंत वाढली. सातार्‍यात डिसेंबर महिन्यात 46 टँकर होते. बरोबर एका महिन्यात सातार्‍यातील टँकरची संख्या 55 पर्यंत वाढली. त्यात माण तालुक्यात सर्वाधिक टँकर वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या 17 डिसेंबर रोजी 38 होती. परंतु, 17 जानेवारी 2019 रोजी ही संख्या 46 वर गेली. तसेच सांगलीतील टँकरची संख्या एका महिन्यात 18 वरून 44 पर्यंत वाढली आहे. महिना भरात टँकरची संख्या 50 ने वाढल्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यानंतर टँकरचा आकडा चांगलाच मोठा झालेला दिसून येईल, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे.