31 मेरोजी होणार मतमोजणी
नवी दिल्ली : गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात 28 मेरोजी मतदान होणार असून, 31 मेरोजी निकाल जाहीर होईल. पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही 28 मेरोजी होणार आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभेची जागा रिक्त असून, पलूस विधानसभा मतदारसंघाचे आमदार पतंगराव कदम यांचेही निधन झाल्याने तेथेही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
याचिका फेटाळल्याने मार्ग मोकळा
या मतदारसंघात पोटनिवडणूक घेऊन जनतेच्या पैशांचा अपव्यय करण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी जनहित याचिका प्रमोद गुडधे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र ही याचिका फेटाळून लावल्याने पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. तर भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभेची जागा रिक्त आहे. वनगा यांचे 30 जानेवारी 2018 रोजी निधन झाल होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पलूस मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. पतंगराव कदम सांगली जिल्ह्यातील पलूस मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. 9 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.