गोकुळ गेस्ट हाऊसमध्ये थांबलेल्या पासपोर्ट एजंटचा मृत्यू

0

जळगाव । रेल्वे स्टेशन परिसरातील गोकुळ गेस्ट हाऊस येथे गेल्या सहा महिन्यांपासून थांबलेल्या वृध्द पासपोर्ट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एजंटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अन् पोलिसांनी उघडला दरवाजा
जयनगरातील रजनिश रमेश लाहोठी यांचे रेल्वे स्टेशन परिसरात गोकुळ गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये रूम नं. 4 मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पासपोर्ट बनविणारे एजंट मनोहर विठ्ठलभाई पटेल (वय-65) हे थांबलेले होते. परंतू 24 मे रोजी गेस्ट हॉऊसच्या कर्मचार्‍यांनी त्यांना मोबाईलवर कॉल केला असता तो उचलला नाही. त्यानंतर पटेल हे कामात असतील म्हणून कर्मचार्‍यांनीही दुर्लक्ष केले. त्यानंतर 25 रोजी बुधवारी सकाळी 10 वाजता गेस्ट हॉऊसमध्ये पटेल यांना भेटण्यासाठी ग्राहक आल्यानंतर पुन्हा गेस्ट हॉऊसच्या कर्मचार्‍यांनी त्यांना फोन लावला. परंतू फोन उचलत नसल्याने कर्मचार्‍यांनी दार ठोठावले.

अकस्मात मृत्यूची नोंद
कर्मचार्‍यांना संशय आल्यानंतर त्यांनी रजनिश लाहोठी यांना याबाबत कळविले आणि लाहोठी यांनी शहर पोलिस ठाण्यात या विषयी माहिती दिल्यानंतर गेस्ट हॉऊसमध्ये पोलिसांच्या समक्ष डुब्लीकेट चावीने दार उघडल्यानंतर पटेल हे मयत स्थितीत मिळून आले. यानंतर रजनिश लाहोठी यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर हृदयविकाराच्या झटक्याने पटेल यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.