पुणे । भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचा बुधवारी क्लास घेतला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला आपापल्या प्रभागांमध्ये विविध कार्यक्रम राबवण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे समजते.
राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाची निवडणूक आणि पक्ष कार्यालय एवढ्यापुरते सीमित राहणारे गोगावले मात्र वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. बुधवारी सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यावर महापालिकेच्या भाजप कार्यलयात त्यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. आगामी काळात काय अजेंडा राबवायचा यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. अर्थात अनेकांची नगरसेवक होण्याची पहिलीच वेळ असल्याने ते बघ्याच्या भूमिकेत बसलेले असतात असेही चित्र बैठकीत असते. येत्या शनिवारी (दि.22) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्याने त्या दिवशी पक्षाच्या आणि महापालिकेच्या व्यतिरिक्त नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमधील विकास कामांचे उद्घाटन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्याचे समजते. याशिवाय वाढदिवसाच्या दिवशी कोणतेही फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात येऊ नये, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. विद्यापीठाच्या सिनेट सदस्यासाठी लवकरच निवडणूक होणार असून प्रत्येक नगरसेवकाने वाणिज्य शाखेच्या 25 पदवीधारकांची मतदार म्हणून नोंदणी करायची आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी प्रति नगरसेवक 25 अर्ज देण्यात आल्याचे समजते.
नगरसेवकांसमोर यक्षप्रश्न
निवडणुका होऊन सहा महिने उलटले आहेत. अर्थसंकल्प सादर होऊन जेमतेम अडीच महिनेही पूर्ण झालेले नाहीत. अनेक सभासद वर्गीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी विकासकामे उभी करून त्यांची उद्घाटने कशी करायची असा यक्ष प्रश्न नगरसेवकांसमोर पडला आहे.