नवी दिल्ली: भाजपचे खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना देशभक्त संबोधले होते. यावरून देशभरात टीकेची झोड उठली होती. अखेर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी आज शुक्रवारी २९ रोजी लोकसभेत माफीनामा सादर केला आहे. महात्मा गांधी यांचे देशाच्या जडणघडनीत मोठे योगदान आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. मात्र माझ्या वक्तव्याचे विपर्यास केले गेले असे सांगून साध्वी प्रज्ञा सिंग यांनी सभागृहात माफी मागितली.
मात्र यावेळी त्यांनी विरोधकांनी माझ्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसताना मला जाहीरपणे आतंकवादी संबोधले. हा माझा आणि समस्त महिलांचा अपमान असून विरोधकांनी देखील माफी मागावी अशी मागणी साध्वी यांनी केली.
साध्वी यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटले होते, यावरून विरोधकांनी देशभरात साध्वी यांच्यावर टीका करत साध्वी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. माफी मागण्याचे देखील सांगण्यात येत होते, अखेर आज साध्वी यांनी माफी मागितली आहे.
आज लोकसभेत कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजपात जोरदार खडाजंगी झाली. राहुल गांधी यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांना आतंकवादी संबोधले होते. राहुल गांधींनी एका महिला खासदारांचा अपमान केल्याने त्यांनी देखील माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लोकसभेत केले. राहुल गांधींच्या विरोधात लोकसभेत घोषणाबाजी करण्यात आली.