पुणे । शिवाजीनगर येथील गोदामांच्या जागेचा ताबा मेट्रोला दोन महिन्यात देण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत. मेट्रोच्या कामांना अधिक गती देण्यासाठी मंत्रालयात पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवाजी नगर येथील गोदामांची जागा मेट्रोसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना पालकमंत्री बापट यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिली आहे. या बैठकीला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी, अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील गोदामाच्या जागेत मेट्रोचे मुख्य स्थानक उभारण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील जागेत असणारी धान्य गोदामे, सेतू सेवा केंद्र, पुरवठा विभागाची कार्यालये तसेच निवडणूक विभागाची गोदामे अन्यत्र हलवावी लागणार आहेत. ही गोदामे जिल्हा परिषदेची जुनी इमारत, पुणे स्टेशन एसटी स्थानक आणि भोसरी क्षेत्रिय कार्यालय येथे हलवण्यात येणार आहेत. ही कार्यालये स्थलांतरीत करून या जागेचा ताबा दोन महिन्याच्या आत मेट्रोला देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करा, असे आदेश बापट यांनी या बैठकीत दिले. त्यासाठी संबंधित यंत्रणांचे करारनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.