गोधन वाचवण्यासाठी गावकर्‍यांनी कसायांनाच गावबंदी घालावी

0

नंदुरबार। महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात गोवंशाची आणि गोधनाची कत्तल केली जात आहे. हे थांबवण्यासाठी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आता गावकर्‍यांनीच कसायांना गावबंदी करायला हवी, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी चौपाळे ता.नंदुरबार येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलतांना केले. यावेळी अनेक साधक उपस्थित होते.

सहिष्णुतेची शिकवण देणारा हिंदु धर्म सर्वात महान: घोलप
स्वाती घोलप यांनी साधनेचे महत्व आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले की, अवघे विश्‍वची माझे घर, वसुधैव कुटूंबकम यांसारखी सहिष्णुतेची शिकवण देणारा आपला हिंदु धर्म सर्वात महान असून ऋषीमुनींनी आणि संतांनी रामायण आदी ग्रंथांमधून ते महत्व मांडून ठेवले आहे. परंतु आज आपल्याला त्याचा विसर पडत चालला आहे. म्हणून परमपूज्य जयंत आठवले यांनी साधनेच्या बळावर धर्मस्थापना करणे हीच काळानुरूप साधना शिकवली आहे. इसिससारख्या क्रुर लोकांचे राज्य हवे की, सात्विक हिंदु राष्ट्र हवे; याचा विचार करून आपण प्रत्येकाने धर्मरक्षणार्थ साधना करू या; असेही घोलप म्हणाल्या.

प्रमुख वक्ते डॉ. नरेंद्र पाटील यांनी गोवंश हत्याविषयीचे सूत्र मांडले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदु धर्माची प्रचंड हानी केली गेली. आता हे थांबवायचे असून इस्लामिक स्टेट की हिंदु राष्ट्र? हा पर्याय निवडायला लावणारी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु संविधानात केवळ हिंदु राष्ट्र हा शब्द टाकून रामराज्य स्थापन होणार नाही. श्रीरामाला अपेक्षीत सात्विकता आणि छत्रपतींना अपेक्षीत धर्मप्रेम आपल्या स्वतःमधे निर्माण करावे लागेल. म्हणून प्रतिदिन अनुभवास येणार्‍या सामाजिक दुष्प्रवृत्तींशी आणि सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराशी लढायचे आहे; असे सांगून डॉ.नरेंद्र पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीने चालवलेल्या सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियानाची माहिती दिली.

सभेच्या प्रारंभी शंखनाद
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा अमृतमहोत्सव सध्या साजरा केला जात आहे. यानिमित्त नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर दि.10 मे 2017 रोजी ही हिंदु राष्ट्र जागृती सभा घेण्यात आली. या सभेच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉ.नरेंद्र पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रतिज्ञा वाचन रोहित चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन कल्याणी बंगाळ यांनी केले. या सभेसाठी ज्ञानेश्‍वर राठोड, लालचंद राठोड, पंडित महाजन, गावातील भजनी मंडळ, क्षितीज मराठे, मयूर चौधरी, ऋषिकेष सोनार, जितू मराठे, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, भावना कदम आदींनी परीश्रम घेतले.