मुंबईतील बीकेसी मैदानावर भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यानिमित्ताने राज्यभरातून माणसे आणून सत्ताधार्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यानिमित्ताने अत्यंत ठळक आणि प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीतपणे भरलेली बाब ठरली ती, ज्या स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख दिली, त्या गोपीनाथरावांनाच सत्ताधारी हेतूपुरस्सर विसरलेत. स्व. मुंडे यांचे छायाचित्र तर सोडाच. परंतु, साधी आठवणदेखील कुणी काढली नाही. या प्रवृत्तीला कृतघ्नपणा म्हणतात, आणि हा कृतघ्नपणा सत्ताधार्यांनी मुद्दामहून दाखवला. त्याचा मुंडेसमर्थकांनी जोरदार विरोध केला, निदर्शने केली. फडणवीस-मोदी-शहा यांच्या नावाने घोषणाबाजी केली. परंतु, मुंडे समर्थकांचा आवाज दाबण्यात आला. भाजपच्या या कृतघ्नवृत्तीचा दूरगामी परिणाम होणार आहे. राज्यातील वंजारी समाजासह तमाम बहुजन समाज संतप्त झालेला आहे. या समाजासमोर उद्या भाजपने मतांची झोळी फिरवलीच तर त्यांच्याकडून मतांची अपेक्षाही ठेवता येणार नाही. धक्कादायक बाब अशी, की वडिलांचा इतका सगळा अपमान होत असताना मंत्रिपदावर असलेल्या पंकजा मुंडे-पालवे या शांत कशा बसल्यात? त्यांना स्वाभिमान नावाची काही चीज आहे की नाही? एखाद्या स्वाभिमानी मुलीने तेव्हाच मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सत्तेला लाथ मारली असती आणि वडिलांच्या अशा हेतूपुरस्सर केलेल्या अपमानाचा बदला घेतला असता. परंतु, स्व. मुंडेसाहेबांचा मृत्यू जसा संशयास्पद आहे आणि त्यावर पंकजांनी मूग गिळलेले आहेत, तद्वतच काल इतका मोठा अपमान होऊनदेखील केवळ सत्तेच्या हव्यासापोटीच त्यांनी तो अपमानाचा कडू घोटही गोड मानून गिळला आहे. त्यांच्या या कृतीचा राजकीय फायदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हा मुद्दा घेऊन ते राज्यात बहुसंख्येने असलेल्या वंजारी समाजासमोर जातील, त्याचे राजकीय भांडवलदेखील करतील, त्याला पंकजा काय उत्तर देणार आहेत? खरे तर पंकजा मुंडे-पालवे यांची अशी राजकीय कोंडी करण्यासाठीच भाजपच्या चाणक्यांनी हेतूपुरस्सर स्व. मुंडेसाहेबांचे छायाचित्र जाहिरातबाजीत टाळले नाही ना? असाही संशय आम्हाला येऊ लागला आहे. त्यातून पंकजांची राजकीय व मानसिक कोंडी आणि भाजपचा कोडगेपणा दोन्हीही चव्हाट्यावर आला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर धनंजय मुंडे यांनी दोन मुद्दे उपस्थित केले होते. धनंजय म्हणाले होते, ज्या भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम केले, त्यांच्याच कार्याचा सरकारला विसर पडला आहे आणि दुसरा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना, अध्यासने आणि तत्सम प्रकारच्या घोषणा केल्यात, त्या फोल ठरल्या आहेत. जसे की, मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्व. मुंडेसाहेबांच्या नावाने एक अध्यासन विभाग सुरू केला होता. त्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्घाटनावेळीच केली होती. परंतु, अद्यापही या अध्यासनाला फुटकी कवडीही मिळालेली नाही. परळी येथील गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने उसतोडणी महामंडळ स्थापना करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. हे सरकार घरी जाण्याची वेळ आली तरी हे महामंडळ स्थापन झालेले नाही. एवढेच काय? औरंगाबादेत स्व. मुंडे यांचे स्मारक उभारण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी औरंगाबादेत येऊन जागेचीही पाहणी केली. स्मारकाला जागा व निधीही उपलब्ध करून दिला. परंतु, खडसेंचे महसूल मंत्रिपद जाताच या स्मारकाचे कामही रखडलेले आहे. म्हणजेच काय तर, हे सरकार स्व. गोपीनाथरावांना हेतूपुरस्सर विस्मरणात घालण्याचा प्रयत्न करते आहे. तसा प्रयत्न होत असेल तर तो यशस्वी होईल हा मोदी-शहा-फडणवीस या त्रिकुटाचा गोड गैरसमज आहे. मुंडे लोकांच्या स्मरणातून कदापिही जाणार नाहीत. राज्यातील तमाम बहुजन समाजासाठी ते दैवत आहेत आणि या दैवताला हे राज्य विसरणे कदापिही शक्य नाही.
प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतंत्र अशी विचारधारा असते, त्यांचे स्वतःचे असे आदर्श असतात. अटलबिहारी वाजपेयी असेपर्यंत याच आदर्शावर भाजपची वाटचाल सुरू होती. आज मात्र आपल्या वैचारिक तत्त्वे व भूमिकेपासून भाजप ढळला आहे. ते कधी काँग्रेसच्या सरदार पटेलांना आयात करतात, तर कधी सामान्य ज्यांच्या योगदानाबद्दलच अनभिज्ञ आहेत, अशा नावांचा उदोउदो करत बसतात. परंतु, शेवटच्या श्वासापर्यंत भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या, भाजपच्या राज्यातील वाढीला समर्पित झालेल्या, शेतकरी-ऊसतोड कामगार यांच्या उत्कर्षाकरिता सतत संघर्ष करणार्या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याला आज भाजपच्या उपेक्षेचे धनी व्हावे लागते, हा सर्वात मोठा दैवदुर्विलास आहे. राज्याचा नेता म्हणून लोकमान्यता मिळवण्यासाठी स्व. मुंडेसाहेबांना मोठा आणि प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. संघटनेतील सर्वोच्च पद आणि सत्तेतील पदापलीकडे जाऊन त्यांना कर्तृत्व सिद्ध करावे लागले. स्व. विलासराव देशमुख यांनी एका भाषणात सांगितले होते, ‘समय से पहले और तकदीर से जादा कुछ नहीं मिलता’, खरे तर हा राजकारणाचा भाग झाला. परंतु, या तकदिराच्या पलीकडेही जाऊन आपले नेतृत्व प्रस्थापित करणे, हे काही येरागबाळ्याचे काम नाही. ते काम स्व. मुंडेसाहेबांनी करून दाखवले. आज पंकजा मुंडे-पालवे या सत्तेच्या आयत्या पीठावर रेघोट्या ओढत आहेत, त्यांना सत्तेचा हा राजमार्ग केवळ मुंडेसाहेबांमुळेच सोपा झालेला आहे. स्व. मुंडे यांनी गावपातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे गुंफले, त्या कार्यकर्त्यांच्या ते सातत्याने अगदी शेवटपर्यंत संपर्कात राहिले. त्यांच्या राजकीय सोशल इंजिनीअरिंगच्या प्रयोगामुळेच माळी-धनगर-वंजारी या राज्यातील सर्वात मोठ्या तीन जातींची वज्रमूठ बांधली गेली. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष यांना सोबत घेऊन त्यांनी आधी लोकसभेचा गड जिंकला; आणि राज्याचे मुख्यमंत्रिपदही आपल्याकडेच येणार आहे, याची खूणगाठ बांधलेली असल्याने विधानसभेचे नेपथ्यही त्यांनीच तयार केले. परिणामी, 48 पैकी 42 जागा जिंकून त्यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट केले.
आज राज्यात भाजपची सत्ता आहे, त्याचे सर्वस्वी सर्व श्रेय हे स्व. गोपीनाथ मुंडे यांनाच जाते. ज्या लोकांची छायाचित्रे पक्षाच्या स्थापना दिनाच्या जाहिरातबाजीत झळकत होती, त्यांचे त्यात कवडीचेही योगदान नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा भाजपचा पोरसवदा प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचा पक्ष आपण सहजपणे लोळवू, अशी राजकीय रचना आखणार्या राज्यातील ‘जाणत्या राजा’ला केवळ स्व. मुंडे यांच्या अचूक नियोजनामुळेच पराभवाची धूळ चाखावी लागले. स्व. मुंडे जिवंत असेपर्यंत त्यांचे बारामतीशी राजकीय वैर होते, मृत्यूनंतरही हे वैर विधानसभा निवडणुकीतील मतदानातून बाहेर पडले. परिणामी, राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली. परंतु, स्व. मुंडेंना मुख्यमंत्री पाहण्याचे तमाम बहुजनांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आज ज्यांना स्व. मुंडे यांना विस्मृतीत घालण्याची घाई झाली आहे, त्यांनी भाजपचा राजकीय इतिहास वाचून पाहावा. रात्रंदिवस अथक मेहनत घेऊन आणि राजकीय समीकरणे कुशलतेने हाताळून, शेकडो माणसे जोडत स्व. मुंडे यांनी भाजपला ब्राह्मण, सिंधी, गुजराथी, मारवाडी या उच्चवर्णीयांच्या वर्चस्वातून मोकळे केले आणि बहुसंख्य समाजाचा जनाधार मिळवून दिला. भाजपची बहुजन, अशी प्रतिमा निर्माण करत त्यांनी निवडणुकांत लक्षणीय यश मिळवून दिले. वंजारी, माळी, धनगर, तेली, कुणबी, बंजारा, कोळी-महादेवकोळी, अल्पसंख्याक जाती-जमाती अशा अज्ञात व उपेक्षित जातीप्रवाहांना गोपीनाथरावांनी भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आणले. त्यांना राजकीय ताकद दिली, राजकीय ओळख देत कर्तृत्व सिद्ध कऱण्याची संधीही दिली. 1990-1995च्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका तसेच त्यापुढील प्रत्येक निवडणुकांत उमेदवारी वाटपाचे सर्वाधिकार मुंडेसाहेबांकडे होते. या निवडणुकांत 90 टक्के उमेदवार गैरब्राह्मण आणि गैरमराठा होते, हे विसरून चालणार नाही आणि हे उमेदवार निवडून आणण्याचे कामही त्यांनी केले होते. 1995च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत हेच बहुजन कार्ड वापरून स्व. गोपीनाथरावांनी शिवसेना-भाजप युतीला सत्तेचे दार खुले करून दिले होते, हे विसरून कसे चालेल? बहुजनवर्गाची नस अचूक सापडलेले स्व. मुंडे हे या वर्गाचे पंचप्राण आहेत. काल त्यांचा विसर पाडून, त्यांना हेतूपुरस्सर विस्मरणात घालून भाजपने आपल्या पायावर कुर्हाड तर पाडून घेतलीच. परंतु, राज्यातील तमाम बहुजन समाजाच्या नजरेतूनही हा पक्ष आता उतरला आहे.
जनता खड्यासारखी बाजूला फेकेल
सन 2014च्या निवडणुकीत भाजपचा पोरसवदा प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचा पक्ष आपण सहजपणे लोळवून टाकू, अशी रचना करणार्या राज्यातील ‘जाणत्या राजा’ला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी रचलेल्या सोशल इंजिनीअरिंगच्या नेपथ्यामुळे दारुण पराभवाचा सामना करावा लागला. रात्रंदिवस दौरे, अथक परिश्रम आणि कुशलपणे हाताळलेली राजकीय समीकरणे यामुळे राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर तर आलाच. परंतु, केंद्रात 42 खासदार पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हातदेखील बळकट केले. भाजपला गावकुसात पोहोचवण्याचे भगीरथ प्रयत्न करणारे कुशल नेतृत्व स्व. गोपीनाथ मुंडे यांना मात्र आज सत्तेवर आलेला हाच पक्ष विसरला आहे. कालच्या पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यात स्व. मुंडे यांना हेतूपुरस्सर विस्मरणात नेण्यात आले. राज्यभर झळकलेल्या जाहिरातबाजीमध्येही मुंडे यांचे छायाचित्र टाळण्यात आले. मुंडेंनी ज्या लोकांना राजकारणात मोठे केले, ज्यांना जनाधारच नाही, अशा लोकांची छायाचित्रे या जाहिरातबाजीत मोठ्या डौलाने झळकत होती. परंतु, भाजपने हे लक्षात ठेवायला हवे. तुम्ही स्व. गोपीनाथराव मुंडे यांना विसरत आहात, म्हणजे तुम्ही सत्ता गमावण्यासाठी स्वतःच्या हाताने पायावर कुर्हाड पाडून घेत आहात. या राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, अमित शहा यांच्या तोंडाकडे पाहून भाजपला सत्ता दिली नव्हती. या लोकांना राज्यात कुणीही ओळखत नाही. स्व. गोपीनाथराव मुंडे, नाथाभाऊ खडसे, पांडुरंग फुंडकर या बहुजन नेत्यांमुळेच भाजपने सत्तेचा सोपान चढलेला आहे. आज याच लोकांना खड्यासारखे बाजूला सारण्याचे पाप तुम्ही केले. उद्या हीच जनता तुम्हाला खड्यासारखे सत्तेतून बाहेर काढून फेकणार आहे!
– पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, जनशक्ति, पुणे
8087861982