रावेर पोलिसांकडून दोघांना अटक : दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
रावेर- तालुक्यातील रसलपूर येथून बेकायदेशीररित्या गो मांस बर्हानपूरकडे चारचाकी वाहनातून नेले जात असताना काही गोमांस भरलेली पिशवी जमिनीवर पडल्याने संतप्त जमावाने टाटा मॅजिक गाडी या चारचाकीला पेटवून दिल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील रसलपूर येथे सकाळी घडली. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर दोघांना अटक करण्यात आली.
गोमांस पडल्याने जमाव प्रक्षुब्ध
गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक (क्रमांक एम.पी.68 पी.137) मधून चालक शेख वसीम शेख इस्माईल (रा.मदिना कॉलनी, रावेर) हा रसलपूर गावातून गोमांस घेऊन जात असताना गतिरोधकावर गाडी आल्यानंतर मागील बाजूचा दरवाजा उघडल्याने गोमांस भरलेली पिशवी खाली रस्त्यावर पडली. ही बाब कानोकानी ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जमावाच्या भावना संतप्त झाल्याने टाटा मॅजिक गाडी पेटवून देण्यात आली.
घटनास्थळी पोलिस अधीक्षकांची भेट
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रसलपूर येथे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषारानी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाढळे आदींनी भेट देत शांतता निर्माण केली.
पोलिस घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास वाकुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे, फौजदार अमृत पाटील व सहकार्यांनी धाव घेतली यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, आयोग पहेलवान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले.
पोलिसांनी केली दोघांना अटक
रावेर पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गाडी चालक शेख वसीम तसेच गाडी मालक शेख शकूर उर्फ कालू (रा.बंडू चौक) यांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी तीन पथक गठीत करण्यात आले आहे. दरम्यान, रसलपूर गावात शांतता असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.