गोमांस वाहतूक प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

0
1 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त 
तळेगाव दाभाडे : अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईतील एक आरोपी मंहमद अक्रम खान याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर समीर हुसेन शेख याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. महमंद अक्रम खान (वय 24, रा.झारखंड), समीर हुसेन शेख (वय 30 झारखंड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये कंटेनर आणि टेम्पोसह दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यांचाकडून सुमारे 1 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे 29 टन वजनाचे 65 लाख रुपये किमतीच्यागोमांसाचा समावेश आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा मानद पशु कल्याण अधिकारी रुपेश हनुमंत गराडे (वय 32, रा.मावळ) आणि शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी फिर्याद दिली होती. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश गराडे व त्यांचा मित्र शेखर गराडे शनिवारी (22 डिसेंबर ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्याजवळ आले असताना गोमांसाची वाहतूक करणारा कंटेनर (क्रमांक एम एच 43 -6458) आढळून आला. अधिक चौकशी केली असता चालक महमंद अक्रम खान याने हे मांस सोलापूर येथून भरला असल्याचे व मुंबई न्हावा शेवा येथे घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगिरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने कंटेनर पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई केली. याच स्वरूपाची दुसरी कारवाई रविवारी मध्यरात्री 12.15 वाजता द्रुतगतीमार्गावरील उर्से टोलनाका येथे करण्यात आली. यात मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोमांस असलेला टेंम्पो (एमएच 17 बी वाय 0622) चालक समीर हुसेन शेख(वय32, रा.जुन्नर,जि.पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.