गोराई गावातील आदिवासी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित

0

बोरीवली : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही बोरिवली पश्चिम गोराई गावात राहणारे हजारो आदिवासी आजही पाणी- वीज या मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. काल अचानक केंद्रीय अनुसूचित जाती- जमाती आयोगाच्या सदस्य माया चिंतामण ईवनातें यांनी आदिवासी पाड्यात भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. तेव्हा हि धक्कादायक बाब उघडकीस आली. दरम्यान याबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्याची बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याची माहिती माया ईवनातें यांनी दिली.त्यांनी काल गोराई- आरे या भागातील आदिवासी वसाहतीत जाऊन नागरिकांशी संवाद साधला.त्यांच्या समवेत सतीश मडावी , चंद्रकांत पवार, विशाल भगत, रीना भगत उपस्थित होते. गोराई जामझाड पाडा येथे राहणाऱ्या आदिवासींना आजही दूरहून पाणी आणावे लागते. तर वीज नसल्याने अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हजारो कोटींचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या मुंबई महानगर पालिका हद्दीत समावेश होऊनही पालिका प्रशासन यांच्या समस्यांकडे कानाडोळा करते.तर गावातील एकमेव विहीरही स्वच्छ केली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी यन्नी दाते यांनी केला. त्यामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना करावं लागतो.

जिल्हाधिकारी कार्यालयात विजेसाठी अनेकदा अर्ज करूनही त्यावर कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. रिलायन्स एनर्जीचे अधिकारी पोल बसवा मग वीज देतो असे सांगतात परंतु सूत्र काही हलत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर पालिका अधिकारी घरपट्टी लावण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आमच्या नजीकच्या बंगले मालकांना सर्व सुविधा मिळत असताना आम्हाला या मूलभूत सुविधांपासून का वंचित ठेवले जाते असा सवालही स्थानिक युवकांनी केला. आमची पिढी बरबाद झाली आतातरी वीज द्या जेणेकरून आमची मुले शिकून मोठी होतील अशी विनंती चंदू परेड यांनी याप्रसंगी केली. या समस्यांचे निवेदन स्थानिकांनी ईवनातें याना दिले दरम्यान मार्च महिन्यात गोरेगाव आरे कॉलनीत चाफ्याच्या पाड्यात राहणार्‍या प्रमिला रिंजाड यांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. या नाजूक परिस्थितीत रिंजाड यांनी दोन हात करत मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली होती.त्या शूरवीर माता व मुलाची भेट घेऊन ईवनातें यांनी याबाबत उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. या घटनेनंतर रिंजाड यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतक सुरू होते. मात्र, असा प्रसंग पुन्हा उद्भवू नये, म्हणून पोलिसांनी संजय गांधी नॅशनल पार्कमधील बिबट्यांना पिंजर्‍यात कैद करण्याची सूचना केली होती.

मात्र, पिंजर्‍यात बिबट्यांना कैद करून ठेवल्यास त्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो, असा दावा करत नॅशनल पार्कमधील अधिकार्‍यांनी या योजनेस तीव्र विरोध दर्शवला होता. उन्हाच्या हंगामात नॅशनल पार्कमधील पाणी साठा आटला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात बिबट्या सीमा ओलांडून रहिवाशी परिसरात ये-जा करत आहे. चाफ्याच्या पाड्यात २० मार्च रोजी घडलेला प्रकार या भावनेतूनच झाला होता. रॉयल पाल्म, कालता पाडा, युनिट १७ आरे आणि शेजारील पसिरात बिबट्या गेल्या आठवड्यात वारंवार दिसून आला आहे.