मुंबई । हार्बर रेल्वेचा गोरेगावपर्यंत विस्तार करतानाच पुढील महिनाभरात गोरेगाव-पनवेल हार्बर सेवा सुरू करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन ढेपाळले असून या मार्गावरील प्रवाशांना आता थेट पावसाळ्यानंतरच या मार्गावर प्रवास करता येणार आहे. पावसाळ्यानंतरच ही सेवा सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हार्बर रेल्वे अनेक वर्षे सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी ते अंधेरी सेवेपर्यंतच मर्यादित होती. एमयूटीपी-2 योजनेअंतर्गत अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात आले. या कामाला 2009 साली सुरुवात करण्यात आली. मात्र ते रडतखडतच सुरू होते. अनंत अडचणीनंतर हे काम डिसेंबर, 2017 ला पूर्ण झाले. त्यामुळे सुरुवातीला 88 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित असलेल्या या प्रकल्पाचा खर्च थेट 214 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार केल्यानंतर महिनाभरातच म्हणजे मे-जूनपर्यंत गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानही सेवा देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. सध्या पनवेल ते अंधेरी दरम्यान 18 फेर्या आहेत. त्या गोरेगावपर्यंत वाढल्या असत्या. परंतु हे काम लांबले आहे. आता पावसाळ्यानंतरच ही सेवा सुरू करू, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
रविवारी जम्बो मेगाब्लॉक
रेल्वे मार्ग, सिग्नल आणि ओव्हरहेडविषयक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी रविवार, 17 जून रोजी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या काळात जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर कामांसाठी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकात पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असून यासाठी शनिवार, 16 जून रोजी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. या ब्लॉकमुळे लोकल तसेच लांबपल्ल्याच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. डाऊन धिम्या मार्गावर मध्यरात्री 1.45 ते पहाटे 5, अप धिम्या आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 12.45 ते सकाळी 6.25, तर अप जलद मार्गावर मध्यरात्री 1.45 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत ब्लॉकचे काम चालेल. 16 जून रोजी धावणारी ट्रेन भुसावळ-मुंबई पॅसेंजर आणि 17 जून रोजी धावणार्या ट्रेन मुंबई ते भुसावळ पॅसेंजर ट्रेन, पुणे ते मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस आणि ट्रेन मुंबई ते पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.