जळगाव। गोलाणी मार्केटमधील अस्वच्छता, शौचालयांची दुरावस्था, पार्किंगची समस्येसह दिवसा व रात्री सुरक्षा रक्षक नेमणे या मागण्या घेऊन गोलाणी मार्केटच्या व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने महापौर नितीन लढ्ढा यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सुनील पंजवानी,घमंडीराम सोनी, महेश सोनी, शिरीष शेळके, महेश भंगाळे, नगराज पाटील, रामजी सुर्यवंशी, सुभाष कासट, पुरूषोत्तम टावरी, संजय बोंडे यांचा समावेश होता. याप्रसंगी भाजपा गटनेते सुनील माळी, नगरसेवक सुनील महाजन, अमर जैन, श्यामकांत सोनवणे, अजय पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.
5 बंद लिप्ट सुरू करण्याची मागणी
मार्केटच्या चौथ्या मजल्यावर येतांना ग्राहकांना त्रास होत असल्याने मार्केटमधील 5 बंद लिप्ट सुरू करण्याची मागणी व्यापार्यांनी केली. याला उत्तर देतांना महापौरांनी सांगितले की, यासर्व लिप्ट व्यापार्यांची इच्छा असेल व त्यांनी महापालिकेची परवानगी मागितल्यास त्यांना लिप्ट हस्तांतरीत करण्यात येईल असे स्पष्ट केले. या लिप्टचा देखाभाल, दुरूस्तीचा खर्च व्यापार्यांनी करावयचा आहे असेही लढ्ढा यांनी निदर्शनास आणून दिले. याला व्यापार्यांनी मान्यता दिली असून गोलाणीतील लिफ्ट सुरू करण्याचा प्रस्ताव देण्याची तयारी दर्शविली आहे.
गोलाणी पार्किंगची दैनदिन स्वच्छता करणार…
गोलाणी मार्केटची दैनंदिन स्वच्छता महापालिकेकडून करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. महापौर लढ्ढा यांनी दैनंदिन स्वच्छता व्यापार्यांनीच करावी अशी ठाम भूमिका मांडली. व्यापार्यांनी गळ घातल्यावर महापौर लढ्ढा यांनी पार्कींगची महापालिकेकडून स्वच्छता करण्याचे मान्य केले. तसेच आठवड्यातून एकदा कॅरीडोअरची स्वच्छता महापालिका कर्मचारी करतील असे स्पष्ट केले.
मार्केटमधील नियमापेक्षा जास्त आकाराचे फलक लावण्यात आलेले आहेत. हे फलक अतिक्रमण विभागाकडून काढण्यात येत असतात. हे फलक लावणार्या दुकानदाराकडून अतिरिक्त रक्कम घेऊन परवानगी देण्यात येईल असे महापौरांनी सांगितले. तसेच या फलकांतून येणारे उत्पन्न गोलाणी मार्केटमधील साफसफाईवर खर्च करण्यात येईल असे सांगितले. महापालिकेने ुगोलाणी मार्केटला सुविधा द्याव्या अशी अपेक्षा व्यापार्यांनी यावेळी व्यक्त केली. गोलाणी मार्केटला सकाळी 7 वाजता पाणी देण्यात येते मात्र व्यापारी 10 वाजता येत असल्याने पाणी 10 वाजेच्या सुमारास देण्याची मागणी करण्यात आली. याला महापौर यांनी रोटेशनुसार पाणी देण्यात येईल असे स्पष्ट शब्दात सांगितले. महापालिकेकडे वारंवार समस्यांचे निवेदन देऊनही निराकरण करण्यात येत नसल्याने व्यावार्यांनी नाराजी व्यक्त केली. मार्केटमधील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याचे शिष्टमंडळाने महापौरांचे लक्ष वेधले. महापौर लढ्ढा यांनी व्यापार्यांना पे अॅण्ड पार्क तत्वावर एजन्सी नियुक्ती करण्याचे सूचित केले. अशा एजंसली शौलचालय निःशुल्क देण्याची तयारी महापौरांनी यावेळी दाखविली.