जळगाव। गोलाणी मार्केट आणि परिसरात घाण व अस्वच्छता असल्याच्या तक्रारीनंतर उपविभागीय दंडाधिकारी जलाल शर्मा यांनी शनिवारी गोलाणी मार्केटसह परिसरातील गाळे चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हे आदेश प्राप्त होताच रविवारी गाळेधारकांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे धाव घेत गाळे सील करण्याची प्रक्रीया थांबविण्याची विनंती केली. तसेच व्यापार्यांना गोलाणी मार्केटची स्वच्छता करणे शक्य नसल्याचे श्री. निंबाळकर यांच्या निर्देशनास आणून दिले. यानंतर श्री. निबांळकर यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन चार दिवस गोलाणी मार्केट बंदचा निर्णय तात्काळ मागे घेतला. श्री. निंबाळकर यांच्या आदेशाने सोमवारी महानगर पालिकेच्या कर्मचार्यांनी गोलाणीची साफसफाई केली.
दोघांना हजार रुपये दंड
मार्केटमध्ये प्रत्येक विंगवर महानगर पालिकेचे दोन कर्मचारी राहणार आहेत. ज्या दुकानाच्या बाहेर कचरा दिसेल त्यांला तिथल्या तिथे हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. आज दोन मोबाईल विक्रेत्यांना हजार रुपये दंड करण्यात आला. दंड न भरल्यास दुकान सील करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. गोलाणी मार्केट व परिसरातील स्वच्छता महानगर पालिका कर्मचार्यांमार्फेत तीन महिन्यांपर्यंत करून मार्केटचा सफाई ठेका देण्याचे बैठकीत ठरले. यानुसार गोलाणी मार्केट व परिसर स्वच्छतेचे काम महानगर पालिकेच्य विविध विभागातील कर्मचार्यांमार्फेत सोमवारी हाती घेण्यात आले. या साफसफाई अभियानामुळे गोलाणी मार्केटमधील व्यापार्यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रभारी आयुक्त श्री. निंबाळकर यांच्या आदेशानंतर साफसफाई करण्यात आली.
सकाळी 6 वाजताच कर्मचारी हजर
सोमवारी सकाळी 6 वाजता महानगर पालिकेचे आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाचे जवळपास 550 कर्मचारी दाखल झालेत. यानंतर या कर्मचार्यांचे स्वंतत्र गट तयार करून त्यांना प्रत्येक मजल्याची सफाईची कामगिरी देण्यात आली. यावेळी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार तसेच सर्व विभागांचे प्रमुख व अभियंते जातीने हजर होते.
कर्मचार्यांना स्वच्छता करण्याची ताकीद
आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी कर्मचार्यांना यावेळी सूचना दिल्यात. ज्या कर्मचार्यांचे काम समाधानकारक असणार नाही किंवा त्यांनी कामचुकारपणा केल्यास अशा कर्मचार्यांना घरी पाठवून देऊ अशी तंबी दिली. तसेच अधिकार्यांनी कर्मचार्यांकडून काम करून घेतले नाही तर त्यांना निलंबीत करण्यात येईल अशीही ताकीद दिली. मार्केटच्या खिडकीतून टाकलेला परदीवरील कचरा उचल्यास सांगितले. अशा प्रकारे खिडकीतून कचरा टाकणार्या दुकानदारांकडून दंड आकरण्याचे आदेश दिलेत. तळमजल्यावरील ज्या भाजीपाला दुकानदारांनी टाकलेले पाल काढण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत. यावेळी महापौर नितीन लढ्ढा व नगरसेवक जितेंद्र मुंदडा यांनी देखीलभेट देऊन पहाणी केली.
दिडशे टन कचरा झाला जमा
वर्षांनुवर्ष साफ न झालेले मार्केट साफ करण्यासाठी महानगर पालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते. यावेळी संपूर्ण मार्केटचा विजपुरवठा बंद करण्यात आला होता. कर्मचार्यांनी काढलेला कचरा उचलून नेण्यासाठी आरोग्य विभागाचे 3 डंपर, 4 टॅक्टर, 2 घंटागाडी, स्कीपलोडर 2, पीकअपव्हॅन 4 असा वाहनांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता. महानगरपालिकेच्या 550 कर्मचार्यांनी दिवसभरात 78 ट्रॅक्टर कचरा गोळा केला. हा कचरा जवळपास दिडशे टन एवढा होता. कर्मचार्यांनी सकाळपासूनच स्वच्छता केल्याने संध्याकाळी मार्केट व परिसर पूर्णपणे स्वच्छ झालेले दिसून आले. प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी सकाळी व दुपारी मार्केटला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. यात दोन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.