जळगाव। शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गोलाणी संकुलात तसेच परिसरातील घाण-कचर्यांच्या साफसफाई तसेच सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्याने परिसरात दुर्गंधी येत असून यातून नागरिकांच्या आरोग्याची समस्याची निर्माण झाल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी शरद काळे यांनी 24 मे 2017 रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. शरद काळे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना आज केलेल्या पाहणीत आढळून आल्याने त्यांनी गोलाणी मार्केट व परीसरातील सर्व गाळे 19 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारीत केले आहेत. आयुक्तांना गोलाणी संकुलाच्या प्रत्येक मजल्यावर घाण साचलेली दिसून येत होती. तर जेथे कोठे कचरापेटी लावण्यात आली होती त्या कचरापेटीतून कचरा ओसंडून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कारवाई फोल: शरद काळे यांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेने 8 जून 2017 पर्यंत स्थळपाहणी अहवाल सादर करण्याचे दंडाधिकार्यांनी सांगितले होते. यानुसार आरोग्यविभागाने 9 जून 2017 रोजी गोलाणी मार्केट व परिसरात कार्यवाही केल्याचा अहवाल सादर केला होता. या अहवालातील फोलपणा शनिवारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त यांनी शहरातील स्वच्छतेच्या पाहणीअंतर्गत गोलाणी संकुलाची व परिसराची प्रत्यक्ष पाहणी करतांना दिसून आला. गोलाणी मार्केटच्या तळमजल्यापासून ते टेरेसपर्यंत सर्वत्र गोलाणी कचर्याने व्यापलेले आयुक्तांना आढळून आले. टेरेसवर दारूच्या बाटल्या फोडलेल्या व इतरत्र विखुरलेल्या आढळून आल्या. गोलाणी मार्केट चोहोबाजूने कचरा तसेच घाणीने वेढलेले आढळून आले.
कडक कारवाई
प्रभारी आयुक्तांनी या परिसरातील भयंकर स्थिती पाहता दि. 19 जुलैपर्यंत गोलाणी मार्केटसह परिसरातील सर्व गाळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चार दिवसानंतर पुन्हा केलेल्या पाहणीत समाधानकारक स्थिती न आढळल्यास मार्केट व परिसरातील सर्व गाळे बंद ठेवण्यात येतील व संबंधीतांवर प्रशासकीय अधिकार्यांने दिलेल्या आदेशाचे उल्लघंन करण्याचा भादंविसं कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारीत केले आहेत.