सांगवी : येथील पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडेबारा वाजता फोन वाजला…, फोनवर एका महिलेने शहीद भगतसिंग चौकात गोळीबार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र, घटनास्थळी पोहचताच असे काही झालेच नसल्याचे उघड झाले. या घटनेचा सखोल तपास केला असता हा फोन महिलेने नाही तर एका तरुणाने केवळ पोलिसांची फिरकी घेण्यासाठी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या तरुणास ताब्यात घेतले आहे.
गोळीबार झाला नाही
सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री कंट्रोल रुमवरुन कॉल आला की, पिंपळे गुरवच्या भगतसिंग चौकात गोळीबार झाला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेटे हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. कॉल मिळताच शेटे हे इतर कर्मचार्यांसह काही वेळेतच घटनास्थळी पोहचले. मात्र, प्रत्यक्षात तेथे असा काही प्रकारच झाला नव्हता. त्यांनी जवळच्या इमारतीतील सुरक्षारक्षकांना माहिती विचारली तर त्यांनीही असे काही झाले नसल्याचे सांगितले.
कॉल डिटेल्स काढून तरुणाला पकडले
यावेळी पोलिसांनी कंट्रोलरुमला पुन्हा फोन लाऊन संबंधित महिलेला फोन लावण्यास सांगितले. मात्र, त्या महिलेचा फोन बंद आला. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. यावेळी पोलिसांनी संबंधित क्रमांकाचा कॉलर आयडीवरून शोध घेतला. हा क्रमांक एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाचा असल्याचे तपासात उघड झाले. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या तरुणाचा फोन चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी फोन कॉलचे लोकेशन शोधले. यातून पोलिसांनी प्रसाद उर्फ लल्या दीपक पाटील यास ताब्यात घेतले. सुरुवातील त्याने या घटनेशी संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच महिलेचा आवाज काढत हा फेक कॉल केल्याचे कबूल केले.