अडीच किलो सोने लंपास; पाच अज्ञातांवर गुन्हा दाखल
वेगवेगळ्या माध्यमातून तपासणी सुरु
रहाटणी-सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून दुकानातून 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलो सोने पाच जणांनी मिळून चोरून नेले. यामध्ये व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना बुधवारी 6 रोजी दुपारी 1 च्या सुमारास शिवराज नगर रहाटणी येथे घडली. घटनेला आठवड्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आठवड्यानंतरही आरोपी मोकाटच आहेत. त्यानुसार अज्ञात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहाटणी शिवराज नगर येथील पार्क रॉयल सोसायटी समोर पुणेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. 6 रोजी दुपारी एकच्या सुमारास तिघेजण दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतल्या बाजूने बंद केले. त्यांनी व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याचा डिव्हीआर काढून नेला. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये दिव्यांग प्रदीप मेहता (वय 24, रा. रहाटणी) यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरट्यांनी दुकानात लावलेले आणि दुकानातील तिजोरीत ठेवलेले 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, सराफी व्यावसायिकांवर गोळीबार करून आणि दुकानातील सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पळून गेले आहेत. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांसह गुन्हे शाखा आणि इतर पथकांचा संयुक्तपणे तपास सुरु आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तपास केला जात आहे.