शिरपूर। मध्यप्रदेश राज्यातून कत्तलीच्या उद्देशाने धुळेकडे गायींची वाहतूक करणार्या टाटा कंपनीची मालट्रकवर शिरपूर शहर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील हद्दीत असलेल्या टोल नाक्यावर शनिवारी, 4 डिसेंबर रोजी सायंकाळी धडक कारवाई करत 13 गायी व 1 बैलाची सुटका करत आठ लाख 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे, मुंबई-आग्रा महामार्गावरून मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथून महाराष्ट्र राज्यातील धुळेच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने गायींची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना शनिवारी दुपारी मिळाली होती.मिळालेल्या माहितीवरून शहर पोलिसांच्या पथकाने महामार्गावरील टोल नाक्यावर सायंकाळी सापळा रचला होता. दरम्यान, संशयित पीबी 46 एम 3677 क्रमांकाच्या टाटा कंपनीची मालट्रक आढळून आल्याने त्यास थांबवून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनामध्ये 94 हजार रुपये किमतीच्या 13 गायी व 1 बैल असे 14 जनावरे आखुड दोरीने बांधुन व वाहनात कोंबुन त्यांची निर्दयीपणे वाहतूक करुन कत्तलीसाठी घेवून जातांना आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.
चालकासह सहचालक ताब्यात
मालट्रक ताब्यात घेत 8 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करून 14 जनावरांची सुटका करीत तालुक्यातील गोदी येथील गोशाळेत देखभालीसाठी रवाना केली आहेत. कारवाईत चालक पवितरसिंग काश्मीरसिंग जाटवासी (रा. रायपुर खुर्द, ता.अजनाला अमृतसर) व सहचालक कप्तानसिंग पालसिंग (वय 24, रा. झंढी, टाला रोड, ता.जि.अमृतसर, पंजाब) यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.एन.मोरे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.एन.मोरे, पोहेकॉ. अशोक धनगर, पोना हेमंत पाटील, हेमराज जाधव, पोकॉ भूषण कोळी आदींच्या पथकाने केली.