Free Hospital Treatment for Injured Govinda : Benefits in Government Job मुंबई : दहिहंडी उत्सवात गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्यास महापालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील तसेच दुर्दैवाने गोविंदाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. या संदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून या वर्षापासून दर वर्षासाठी लागू राहील. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी सभागृहात मागणी केली.
दहि-हंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर
यंदा राज्य सरकारने दहिहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आधीच जाहीर केली आहे. याचबरोबर, इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकरीत जो काही शासकीय कोटा आहे, त्याचाही लाभ घेता येईल. याशिवाय, शासनाच्या इतरही सुविधांचाही लाभ गोविंदांना घेता येणार आहे. दुर्दैवाने दहिहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जबर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास (होऊ नये पण दुर्दैवाने झाल्यास) पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
जल्लोष उत्साहात होणार गोपाळकाला साजरा
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे, यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दरम्यान, कोरोनानंतरच्या निर्बंधानंतर पहिल्यांदाच होणारा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत आहे.