चिपळूण : वाशिष्टी नदी तीरावरील किल्ले गोविंदगड़ येथे आज (३० जून), महाराष्ट्र कृषी दिन आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड़ सप्ताह मोहिमेच्या पूर्वसंध्येला निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळ महाराष्ट्र या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या तीन वर्षे वयाच्या सुमारे आठ फूट उंचीच्या नीव, सोनचाफा, कांचन जातीच्या झाड़ांचे रोपण गोवळकोटच्या ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ यांच्यातर्फे करण्यात आले.
गोवळकोट मधील स्थानिक तरुणांनी स्थापन केलेली राजे सामाजिक प्रतिष्ठान आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम या दोन संस्था गेली काही वर्षे ऐतिहासिक किल्ले गोविंदगडाच्या विकास आणि संवर्धनासाठी जागरूकतेने सतत कार्यरत आहेत. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळ महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्रभर बीजारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संमेलनासारखे अभिनव उपक्रम सतत आयोजित करत असते. यावेळी राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोटचे संस्थापक सदस्य विशाल राऊत, सहसचिव प्रतिक बुरटे, प्रथमेश शिंदे, प्रशांत पोतदार, रोहित खापरे, सहखजिनदार सौरभ टाकळे, प्रतिक रेमजे, नरेश खापरे,सोहम बुरटे, विघ्नेश साळवी, शुभम टाकळे, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र’ संस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, महेन्द्रगिरी निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष अनिकेत चोपड़े उपस्थित होते. मंड़ळाने तीन वर्षे वयाची वाढवलेली विविध जातीची झाड़े यावेळी वृक्षारोपणासाठी ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ला उपलब्ध करून दिली. दरम्यान लावलेल्या झाडांना जगविण्याची जबाबदारी राजे प्रतिष्ठानच्या तरुणांनी स्वीकारली आहे.
चालू मौसमात रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, ‘वनश्री’ महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देत असलेल्या,५० लाख जंगली बियाणांचे पेरणी अभियान राबविले जाणार आहे. तसेच महत्वाकांक्षी ‘चंदन लागवड कार्यशाळा’ आगामी काळात चिपळूणात होणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ८८३०९१६७१४, ९४२२३७६४३५ येथे संपर्क साधावा.