गोशाळांना समाजाने सढख हाताने मदत करावी : दुधाळे

0

राजगुरुनगर : पंचगव्य ही गोमातेने भारतभूमीला दिलेली अभूतपूर्व देणगी असून जगातील अनेक दुर्धर आजारांवर मात करण्याचे सामर्थ्य पंचगव्यात आहे, त्यामुळे गोशाळांना समाजाने सढळहस्ते मदत करावी असे प्रतिपादन टाटा हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ दुधाळे यांनी केले.

बुट्टेवाडी (ता. खेड) येथील धर्मवीर संभाजी महाराज गोशाळा ट्रस्ट आयोजीत गौ विज्ञान परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष एकनाथ शेटे, गोवंश रक्षण समितीचे प्रांताध्यक्ष राजेंद्र लुंकड, विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संदेश भेगडे, प्रांत संघटक उत्तम कुदळे , मुंबई गोसेवा संस्थेच्या वहिदा खान, प्रदेश गोरक्षाप्रमुख नागनाथ बोंगरगे, भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख ऍड. धर्मेंद्र खांडरे , माजी सरपंच प्रदीप कासवा , ह.भ.प. अशोक महाराज पवार, निलेश आंधळे, गोशाळा ट्रस्ट अध्यक्ष संजय बुट्टे, कार्याध्यक्ष दत्तात्रय सांडभोर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. दुधाळे, राजेंद्र लुंकड, वहीदा खान आदींना गोमाता संरक्षक पुरस्कार संस्थेच्या वतीने देण्यात आले.

पंचगव्य दुर्धर आजांरावर संजीवनी
दुधाळे म्हणाले की, देशी गाईंचे संगोपन आणि संवर्धन केल्यास तसेच वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केल्यास भारतीय गाई या मानवजातीला वरदान असल्याचे दिसून येते. केवळ दुध कमी देते म्हणून तिचे महत्व कमी होत नसून देशी गाईचे दुध आणि पंचगव्य अनेक दुर्धर आजांरावर संजीवनी म्हणून काम करते आहे. तिचे शेण, गोमूत्र यापासून अनेक औषधी उपयोग होतात. अनेक परदेशी व्यक्ती, संस्था पंचगव्याच्या आणि भारतीय गायींच्या अभ्यासासाठी भारतात येत असून भारतीय तरुणांनीही या क्षेत्रात काम करुन आपल्या अमुल्य परंपरेचे संवर्धन करावे असेही ते म्हणाले.

प्रात्यक्षिकांसह माहिती
डॉ.दुधाळे यांनी यावेळी पंचगव्य, देशी गाईचे गोमूत्र,शेण यांचे विविध प्रयोग करुन त्यापासून वीजनिर्मिती, दुर्धर आजारांचे निदान व उपचार यांची प्रात्यक्षिकांसह माहीती दिली. यावेळी संयोजक संजय बुट्टे यांनी गोशाळेचा आढावा घेऊन संस्थेस आर्थिक मदतीचे कळकळीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मेंद्र खांडरे यांनी केले. सुत्रसंचलन माऊली चिंचकर यांनी तर आभार दत्तात्रय सांडभोर यांनी मानले.