थेरगावचा केजुबाई बंधारा पाण्याखाली
शहर्यातील नद्या दुथड्या : पावसाची संततधार
पिंपरी-चिंचवड : शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. थेरगावचा केजुबाई बंधारा पाण्याखाली गेला असून, चिंचवडच्या श्री मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पाणी शिरले आहे. तर शहरातील अन्य नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. तसेच डोंगर प्रदेशातील व नद्यांच्या किना-यावरील गावांना हाय अलर्ट बजावण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 60 टक्के भरले आहे. शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. पाण्याच्या पातळीत जोरदार वाढ झाली आहे. थेरगाव येथील केजूबाई बंधारा वाहू लागला आहे. तसेच पुनावळे येथील बंधाराही पाण्याने तुडूंब भरला असून ओसांडून वाहत आहे. त्यामुळे चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदीरात पाणी भरले आहे.
इंद्रायणी, पवनाला पूरस्थिती
खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने पुणे शहरातून जाणारी मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच लोणावळा आणि मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने इंद्रायणी व पवना नदीला देखील पुराची स्थिती आली आहे. सर्व यंत्रणा पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भूस्खलन होण्याची शक्यता
हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या संततधारेमुळे भूस्खलन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे डोंगर पठारावरील व डोंगर पायथ्याशी राहणा-या नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सर्व पोलीस ठाण्यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तत्पर राहण्यास सांगितले आहे. पुणे ग्रामीण हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिका-यांनी आपल्या पोलीस ठाण्यात आपत्कालीन साधनांची जमवाजमव करून ठेवावी. तसेच नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देऊन सतर्क करावे, असे आदेश देण्यात आले आहे.