गो-तस्करीच्या संशयातून जमावांकडून एकाची हत्या

0

अलवर-जमावाच्या हत्यांविरोधात कठोर कायदा हवा अशी चर्चा घडत असतानाच गोतस्करीचा ठपका ठेवत एका व्यक्तिची जमावांकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानमधल्या अलवर येथे ही घटना घडली आहे. मूळच्या हरयाणाच्या असलेल्या अकबर खानची अलवर जिल्ह्यातल्या रामगड येथे जमावांकडून हत्या करण्यात आली.

गायीना रस्त्यावरून नेत असलेल्या दोन व्यक्तिंना रामगडमधल्या लोकांनी थांबवल्याचे पोलिसांनी सांगितले. ते गायींची तस्करी करत असल्याचा संशय या जमावाला आला. त्यानंतर त्यांनी दोघांनाही अमानुष मारहाण केली. अकबर खान मरण पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार हे दोघेजण हरयाणामधल्या कोलगाव या आपल्या गावातून गायी घेऊन रामगडला आले होते. पोलीस अधिक तपास करीत असून अकबर खानचं पार्थिव अलवरमधल्या सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.

ते दोघं गोतस्कर होते की काय माहित नाही असं पोलिसांनी सांगितलं. जमावामधल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचं पोलिस म्हणाले. लवकरच संशयित आरोपींना अटक करण्यात येईल असं अलवरचे सहपोलिस अधीक्षक अनिल बेनीवाल यांनी सांगितलं.