वाहने जामनेर पालीस ठाण्यात जमा
जळगाव : शहरासह जिल्ह्यात गौण खनिजाचा बेसुमार उपसा सुरूच असून शुक्रवारी मध्यरात्री मुरुमाची तीन व खडीची वाहतूक करणारे एक डंपर तर वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले आहे. हे पाचही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामासाठी या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात असून या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास सर्रासपणे गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहे.
जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असताना वाळूचा बेसुमार उपसा सुरू असल्याचे दररोज समोर येत आहे. या सोबतच मुरुम, खडी यांचीही अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात सध्या जळगाव-औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्या कामासाठी या मार्गावरुन गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहने सुसाट जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री महसूल विभागाचे पथक जळगाव-औरंगाबाद मार्गावर गस्त घालत असताना जामनेर तालुक्यातील पाळधीनजीक गौण खनिजाची वाहतूक करणारे चार डंपर पथकाला आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यात तीन डंपरमध्ये मुरुम तर एका डंपरमध्ये खडी आढळून आली. कागदपत्रांची विचारणा केली असता गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी असणार्या पावत्यांवर महसूल विभागाचा शिक्का नव्हता व परवानाही नव्हता. पहाटे चार वाजता ही चारही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नेरी येथे जामनेर फाट्यानजीक वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टरही आढळून आले. तेदेखील जप्त करण्यात येऊन जामनेर पोलीस ठाण्यात लावण्यात आले.
यांनी केली कारवाई
प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून अतुल सानप, जगदीश धमाले, पो.कॉ. हितेश महाजन यांनी ही कारवाई केली.