गौरवला जागतिक स्पर्धेचे तिकीट

0

नवी दिल्ली । भारताचा 56 किलोगटातील बॉक्सर गौरव बिधुडी नशीबवान ठरला आहे. भूतानच्या बॉक्सरने नकार दिल्यामुळे गौरवचे जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे होणार्‍या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिकीट निश्‍चित झाले आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील प्ले ऑफ लढतीत पराभूत झालेल्या गौरवला आशियाई बॉक्सिंग महासंघाच्या कोट्यातून ही संधी मिळाली आहे. ताश्कंद येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील बॉक्स ऑफ लढतीत हरल्यामुळे गौरवची जागतिक स्पर्धेत स्थान मिळवण्याची संधी हुकली होती. त्या सामन्यात जपानच्या रियोमी तनाकाने गौरवला हरवले होते. पण आशियाई कोट्यातून प्रवेश मिळाल्यामुळे गौरव सुदैवी ठरला आहे. आशियाई बॉक्सिंग महासंघाने याआधी भूतानच्या बॉक्सरला जागतिक स्पर्धेचा प्रस्ताव पाठवला होता. पण भूतानने हा प्रस्ताव नाकारल्यामुळे गौरवला जागतिक स्पर्धेचा दरवाजा उघडला. यासंदर्भात आशियाई बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग संघटनेला ई मेलद्वारे माहिती दिली आहे. आशियाई महासंघाने भारतीय बॉक्सिंग संघटनेला ई मेल पाठवला आहे. भूतानने 56 किलो गटातील कोट्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघटनेने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाशी संपर्क साधून गौरव बिधुडीच्या प्रवेशाची माहिती द्यावी.

बॉक्सरचा फ्रान्समध्ये सराव
जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा 23 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत खेळणारे बिधुडीसह इतर सात बॉक्सर्स सध्या फ्रान्समध्ये सराव आणि प्रशिक्षण घेत आहेत. अमित फंगल (49 किलो), कविंदर सिंग (52 किलो), शिव थापा (60 किलो), मनोजकुमार (69 किलो), विकास कृष्ण (75 किलो), सुमित संगवान (91 किलो) आणि सतीश कुमार (91 किलोवरील) या भारताच्या सात बॉक्सर्सनी याआधीच जागतिक स्पर्धेतले स्थान निश्‍चित केले आहे.