गौरी लंकेश यांच्या हत्येचा वाड्यात निषेध

0

वाडा । ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येने सारा देश व पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गौरी यांचे कर्नाटक बंगळुरू येथून प्रकाशित होणार्‍या लंकेश पत्रिकेच्या त्या संपादक होत्या. दक्षिण पंथीय संघटनाशी त्यांचे वैचारिक मतभेद होते. परखड लिखाण व स्पष्ट विचार मांडणार्‍या विचारवंतातील एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचे नाव होते. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी जसे मोकाट आहेत त्याच प्रकारची ही हत्या आहे. एका पत्रकार व संपादिकेच्या हत्येचा वाडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध केला.

मारेकर्‍यांना शासन करण्याची मागणी
लंकेश यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडून त्यांना फासावर लटकवावे, अशी मागणी वाडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वाडा तहसीलदारांतर्फे देण्यात आलेल्या निषेध निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी वाडा नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी हे उपस्थित होते. वाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव वैभव पालवे, वसंत भोईर, अनंता दुबेले, रूपेश मोकाशी, शशिकांत कासार, निखिल भानुशाली यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.