नवीन कुमारच प्रमुख सूत्रधार : सरकार पक्ष
बेंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला हिंदू युवासेनेचा संस्थापक के. टी. नवीनकुमार याला शुक्रवारी बेंगळुरू येथील महान्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता 5 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे.
15 राऊंड जीवंत काडतुसे जप्त
नवीनकुमार उर्फ होटे मांजा हा कर्नाटकातील मद्दूर येथील राहणारा असून, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला 18 फेब्रुवारीरोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून 18 राऊंड जीवंत काडतुसेही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर 2 मार्चरोजी विशेष तपास पथकाने (एसआयटी) नवीनला ताब्यात घेतले व त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीत गौरी यांच्या हत्येमागे नवीनकुमार हाच मुख्य सूत्रधार असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
जामीन देण्यास विरोध
नवीन कुमारने केलेल्या जामीनअर्जावर शुक्रवारी महान्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली असता, एसआयटीच्यावतीने सरकारी वकिलांनी जामीन देण्यास जोरदार विरोध केला. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नवीनकुमार हा मुख्य आरोपी असून, त्याच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा आहे, अशी मागणी वकिलांनी केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने नवीनकुमारला आणखी 5 दिवसांची एसआयटी कोठडी दिली आहे.