बंगळूर-पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना विशेष तपास पथकाने अटक केली. आर्म्स अॅक्ट अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. अमित रामचंद्र बड्डी आणि गणेश मिस्की अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याचीही माहिती मिळते आहे. या दोन संशयितांना हुबळीतून अटक करण्यात आले आहे. या दोघांनाही कोर्टापुढे हजर करण्यात आले आणि या दोघांनाही कोर्टाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात जी एफआयआर दाखल करण्यात आली त्यात १० जणांची नावे आहेत. यापैकी निहाल अलिआस दादा अजूनही फरार आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी २० जुलैला सातव्या संशयिताला अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला जून महिन्यात अटक करण्यात आली.
मागील वर्षी ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. हल्लेखोराने हेल्मेट घालून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या. गौरी लंकेश यांनी भाजपा विरोधात लिखाण केले होते. गौरी लंकेश या साप्ताहिक ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांच्या सहभाग असायचा. त्या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या.