भुसावळ । येथील कोटेचा महिला महाविद्यालयात इतिहास विभाग व ग्रंथालय विभागातर्फे क्रांती दिन व ग्रंथालयाचे प्रणेता डॉ. रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ. पी.एस. प्रेमसागर, इतिहास विभागप्रमुख जी.जी. खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही.एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक प्रा.एस.एस. पाटील यांनी केले. प्रा.डॉ. पी.एस. प्रेमसागर यांनी महाराष्ट्रातील क्रांतीमध्ये महिलांच्या सहभागाविषयी माहिती दिली.
जात-पात विरहित आंदोलनाने ब्रिटीशांना हादरा
प्रा. प्रेमसागर म्हणाले की, 8 ऑगस्टला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. ब्रिटीशांना वाटले आता आंदोलन होणारच नाही पण 9 ऑगस्टला अरुणा असफअली यांनी गवालिया टँकवर येवून भारताचा तिरंगा फडकवून आंदोलनाची सुरुवात केली. म्हणून खर्या अर्थाने 9 ऑगस्टच्या क्रांतीमध्ये महिलांच्या सहभाग होता, असे आपणास म्हणता येते. खान्देशातही लीला पाटील या सत्यशोधक क्रांतीकारी असून स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या आंदोलनात सामान्य जनतेचा सहभाग वाढला. तळवेल, खिरोदा, आसोदा, भुसावळ या गावांमध्ये सक्रीय आंंदोलन सुरु झाले. हे आंदोलन जात-पात विरहीत होते. सर्व जाती धर्माचे लोकांचा सहभाग या आंदोलनात होता.
खान्देशातील महिलांचा या आंदोलनातील सहभाग नोंद करताना प्रा. प्रेमसागर म्हणाले की, लिला पाटील या खान्देशातील महत्वाच्या क्रांतीकारक महिलांनी साने गुरुजींच्या आवाहनाने अमळनेरमध्ये मार्शल लॉ तोडून तिरंगा फडकविला त्यामुळे त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. त्यांना धुळे, नाशिक, येरडा येथील तुरुंगात ठेवले. तेथून त्या भूमिगत झाल्या सातारला जावून प्रतिसरकारमध्ये सहभागी झाल्या. तुफान सेनेचे नेतृत्व केले. सन 1946 पर्यंत त्या भुमिगत होत्या त्यांना एकूण 9 वर्षांचा कारावास झाला. स्वातंत्र्यानंतर त्या शिरपूरला स्थाईक झाल्या. सन 1985 मध्ये त्यांचे देहावसान झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दिपाली पाटील यांनी मानले.