ग्रंथालय मित्र पुरस्कारासाठी शासनाने अर्ज मागविले

0

२० सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवा

मुंबई । ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०१७-१८ या वर्षाकरिता देण्यात येणार्‍या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय’ आणि ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र’ पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे दोन प्रतीमध्ये २० सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रोत्साहन मिळविण्यासाठी पुरस्कार
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, ग्रंथालय चळवळीस योगदान देणार्‍या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता आणि सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र’ पुरस्कार देण्यात येतो.

अशी आहे वर्गवारी
राज्यतील शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये ५० हजार, रुपये ३० हजार, रुपये २० हजार आणि रुपये १० हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व मानचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना रुपये १५ हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.