भुसावळ- ग्राईंडरसह कटर मशीन लांबवल्याप्रकरणी एका आरोपी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी डीगंबर रामू ठाकरे (नारायण नगर, प्लॉट नंबर 9, जळगाव रोड, भुसावळ) हे जुने बांधकाम तोडण्याचे काम करतात. त्यांनी स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळील खाचणे मंगल कार्यालयाचे बांधकाम तोडण्याचे काम घेतले असून त्यासाठी संदीप प्रकाश तायडे, अशोक राजू सपकाळे, राहुल सदाशीव धांडे यांना कामावर लावले होते. या कामासाठी 12 हजार रुपये किंमतीचे हॅमर मशीन तसेच सहा हजार रुपये किंमतीचे कटर मशीन बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बेसमेंटमध्ये ठेवण्यात आले होते. 15 रोजी सायंकाळी सहा वाजता काम करून सर्व मजूर घरी परतले व दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता कामावर आल्यानंतर मशीन जागेवर नसल्याने ते चोरीस गेल्याचे लक्षात आले व या दिवसापासून कामावरील मजूर तथा संशयीत आरोपी राहुल सदाशीव धांडे (कवठा, ता.अकोट, जि.अकोला, ह.मु.मामाजी टॉकीज, महात्मा फुले नगर, भुसावळ) हादेखील कामावर येत नसल्याने संशय बळावल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी धांडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.