निगडी : येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराज ऊरूस व हनुमान जन्मोत्सवाचे टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव, तसेच काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. ऊरूसानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावच्या पैलवानांनी यात सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली. रोमहर्षक लढतींमुळे कुस्तीचा आखाडा रंगला. ऊरूसानिमित्त श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गावातील शर्यतीच्या बैलांची नगारा, ताशा, डफ अशा पारंपरिक वाद्यांच्या तालात भंडार्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील सजवलेले शर्यतीचे शेकडो बैल मिरवणुकीत सहभागी झाले आले. ऊरूसानिमित्त टाळमंदिर येथे चक्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी जोतिबाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच करमणुकीसाठी रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रंगला.
यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचक्रोशीच्या तालमीतील नामांकित पैलवानांनी सलामी दिली. आखाड्यात राष्ट्रीय महिला कुस्तीपटू तेजल सोनवणे हिचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रेक्षकांना डोळ्याचे पारणे फेडणाजया अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्या. कुस्त्या बघण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती. पंच म्हणून वस्ताद सदाशिव नेवाळे यांनी काम पाहिले. आमदार महेश लांडगे, नगरसेवक राहुल जाधव, दत्ता साने, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, साधना मळेकर, संगीता ताम्हाणे, स्वीनल म्हेत्रे, अंकुश मळेकर, प्रभाकर ताम्हाणे आदी या वेळी उपस्थित होते. टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे ऊरूसाचे व आखाड्याचे आयोजन करण्यात आले. रात्री पारंपरिक पद्धतीने प्रकाश मोरे यांनी चावडीवर बिदागीचे वाटप केले.