ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती

0

थेऊर । चौदाव्या वित्त आयोगांतून 2017-18 साठी मंजूर झालेल्या 12 कोटी 66 लाख 94 हजार 466 रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता ग्रामपंचायतीच्या खात्यांत जमा झाल्याने हवेली तालुक्यांतील ग्रामपंचायती लखपती झाल्या आहेत. या रकमेमुळे ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार, असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.

पंचायत विभागाचे उपमुख्य अधिकारी संदीप कोहीनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 1,407 ग्रामपंचायतींच्या खात्यांत गांवच्या लोकसंख्येच्या प्रमाणांत 78 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यात हवेली तालुक्याला सर्वात जास्त 12 कोटी 66 लाख 94 हजार 466 रुपयांच्या निधी मिळालेला आहे. हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणावर देण्यात आलेला असून, यापूर्वी शासनाच्या लोकोपयोगी योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यासाठी मिळत असलेला निधी प्रथम जिल्हा परिषद, नंतर पंचायत समिती आणि त्यानंतर ग्रामपंचायतीकडे येत होता. त्यावेळी एखादी योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे याचना करावी
लागत असे.

स्व. आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. पंचायत राजमार्फत शासनाचा निधी थेट ग्रामपंचायत खात्यांत वर्ग होऊ लागल्यांपासूनच ग्रामपंचायतींना अधिक अधिकार मिळाले. त्यामुळे नळपाणीपुरवठा आणि इतर लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होऊ लागल्याने त्यांच्यात स्वयंपूर्णता आली.