ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा रावेर पंचायत समितीवर बोंबाबोंब मोर्चा

0

रावेर- महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या रावेर तालुका शाखेचा विविध मागण्यांसाठी रावेर पंचायत समितीवर मंगळवारी बोंबाबोंब मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयजी रल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. शासन निर्देशानुसार ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याचे आदेश असताना ते मानधन ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्यात आले. सदर वेतन हे कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे यासाठी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना 26 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले. गटविकास अधिकारी यांनी कुठलीही कारवाई न केल्याने ग्रामपंचायत कर्मचारी यांनी 8 रोजी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते पंचायत समितीपर्यंत बोंबाबोंब मोर्चा घोषणाबाजी करत काढण्यात आला. प्रभारी गटविकास अधिकारी उपस्थित नसल्याने विस्तार अधिकारी सी.आर.महाले व डी.एच.सोनवणे यांनी मोर्चेकरी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन ऑनलाइन त्यांच्या वैक्तिक खात्यातच टाकण्याचे प्रसंगी आश्‍वासन दिले.

यांची होती उपस्थिती
जिल्हाध्यक्ष विजय रल, जिल्हा सहसचिव राहुल महाले, जिल्हा सदस्य सुरज नरवाडे, तालुकाध्यक्ष दिलीप पंडित, तालुका उपाध्यक्ष सुनील खारे, तालुका सचिव किशोर जावा, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष योगेश नारखेडे, यावल तालुकाध्यक्ष वासुदेव वारके, निलेश भंगाळे, डिगंबर धनगर, बाळू भोई, ललित दोडके, संजू कोळी, प्रकाश वायके यांच्यासह तालुक्यातील सुमारे 230 ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.