निजामपूर । नगर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या साक्री शाखेतर्फे जागतिक दिव्यांग दिवस जनता सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष , पत्रकार शकील दादा शेख यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, साक्री प.स. माजी उपसभापती किरण बच्छाव , जैताने सरपंच संजय खैरनार, विजय राणे, रघुवीर खारकर , धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील ,प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सरचिटणीस बापू पारधी, संगीता पाटील उपस्थित होते. ग्रामपंचायत अंतर्गत 3% अनुदान हे अपंगांसाठी खर्च करण्यात येईल असे आश्वासन जैतवाने व निजामपूर या गावातील दोन्ही सरपंचांनी यावेळी दिले.
योजनांचा लाभ मिळवून देणार
निजामपूर -जैताणे गावातील उपस्थित दिव्यांगांचा सत्कार शिक्षक समितीमार्फत करण्यात आला. सर्वांना अपंग कल्याण योजना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत 3% अनुदान हे अपंगांसाठी खर्च करण्यात येईल असे आश्वासन दोन्ही गावातील सरपंच यांनी दिले. तसेच समाज कल्याण मार्फत मिळणार्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू ,असे आश्वासन वासुदेव बदामे,(प.स.सदस्य),किरण बच्छाव(माजी उपसभापती) यांनी सांगितले.
शिक्षक समितीची मदत
पत्रकार रघुवीर खारकर यांनी शिक्षक समितीच्या कार्याचे कौतुक केले. संगिता पाटील यांनी बँकेत दिव्यांगासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी व पोस्ट ऑफिसच्या पायर्या दुरुस्त कराव्या असे सांगितले. प्रा.शि.समितीचे जिल्हा सरचिटणीस बापू पारधी यांनी अपंग कल्याण योजनांची माहिती दिली. शिक्षक समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिव्यांगाचे सर्वेक्षण करण्यात यावे याविषयी निवेदन आमदार बच्चू कडू याना देण्यात येईल असे सांगितले व जिल्हा परिषद अंतर्गत सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती मदत करेल सारे सांगितले.
यांचा होता सहभाग
अध्यक्ष शकील शेख यांनी दिव्यांगासाठी कार्यक्रम घेतल्याबद्दल समितीचे आभार मानले. तसेच समितीचे तालुकाध्यक्ष सुभाष पगारे यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी कैलास दाभाडे ,सुभाष पगारे,कैलास ईशी, दंगल शिंदे, वैभव देवरे,मनोज पाटील,दाजभाऊ खैरनार, मनोज भागवत यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन कैलास ईशी यांनी केले तर आभार रामचंद्र भलकारे यांनी मानले.