पिंपरीःडॉ.डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्यावतीने सहावे यशवंतराव चव्हाण ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन यंदा 24 व 25 नोहेंबर रोजी मेडशिंगी येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी नगरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांची निवड करण्यात आली आहे. मेडशिंगीचे संभाजीराव शेंडे यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ ग्रामसंस्कृती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांची निवड केली असून कार्याध्यक्षपदी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य,कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची निवड झाली आहे. दि.24 व 25 नोहेंबर या दोन दिवसीय साहित्य संमेलनात परिसंवाद, मुलाखत, कथाकथन, चर्चासत्र, कवीसंमेलन, अभिरुप न्यायालय, कृषीक्षेत्रातील भूमीपुत्रांचा गौरव असे अनेक भरगच्च उपक्रम ठेवण्यात आले आहेत. सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांना हे संमेलन म्हणजे एक पर्वणीच आहे. विविधतेने नटलेली स्मरणीकाही या प्रसंगी प्रकाशित करण्यात येईल.